Sangli News: कृष्णा नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले भेट
By संतोष भिसे | Published: March 13, 2023 04:03 PM2023-03-13T16:03:43+5:302023-03-13T16:07:38+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीसा काढण्याचे काम करते. ठोस कारवाई करत नाही
सांगली : कृष्णेतील पाण्याच्या प्रदूषणाविरोधात दलित महासंघाने सोमवारी आंदोलन केले. नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना भेट दिले. नदीत रसायने व सांडपाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.
गेल्या आठवड्यात कृष्णा नदीत पाण्याच्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मेले. याच्या निषेधार्थ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुष्पराज चौकातील अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून उद्योग भवनमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये वनिता कांबळे, महेश देवकुळे, अनिल आवळे, राहुल पवार, प्रवीण वारे, अजित आवळे, महावीर चंदनशिवे, तेजस मोरे, सागर कांबळे, वैभव कोल्हे, रोहित माटे, मोहन वारे, साहील गायकवाड, प्रकाश वाघमारे, सोनाली मोहिते, अर्जुन मोहिते आदी सहभागी झाले.
त्यांनी मृत मासे उंचावत घोषणाबाजी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नवनाथ अवताडे यांना निवेदन व मृत मासे दिले. अवताडे यांनी सांगितले की, नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या संस्थांना नोटीसा काढल्या आहेत. स्वप्नपूर्ती शुगर या कंपनीला आसवनी उत्पादन प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
मोहिते यांनी सांगितले, की, प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीसा काढण्याचे काम करते. ठोस कारवाई करत नाही. यामुळे सांगलीकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. मंडळाने कडक कायदेशीर कारवाई करावी.