Sangli: इटकरेजवळ नाल्यामध्ये मृत बिबट्या आढळला
By अविनाश कोळी | Updated: November 11, 2023 18:50 IST2023-11-11T18:50:03+5:302023-11-11T18:50:43+5:30
कुरळप : पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटा ते येलूर फाट्याच्या दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंप ते हीरो होंडा शोरूमसमोरील ...

Sangli: इटकरेजवळ नाल्यामध्ये मृत बिबट्या आढळला
कुरळप : पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटा ते येलूर फाट्याच्या दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंप ते हीरो होंडा शोरूमसमोरील एका नाल्यात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास मृत बिबट्या आढळला. कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा केवळ सांगाडाच बाकी राहिला होता.
इटकरे फाटा येथे कुजलेला वास येत असल्याने एका शेतकऱ्याने जवळ जाऊन पाहिले असता, बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. वन विभागाला माहिती समजताच तत्काळ शिराळा वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी, शहाजी पाटील, संजय पाटील, वनरक्षक गौरव गायकवाड, पांडुरंग उगले, विलास कदम, सचिन कदम, अनिल पाटील व रेस्क्यू टीमचे युनूस मणेर घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
यादरम्यान, मुख्य रस्त्याच्या व नाल्याच्या कठड्याला रक्त लागल्याचे दिसून आले. यावरून मागील दहा दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या नाल्यात पडला असावा. दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसाचे पाणी नाल्यात साचल्याने बिबट्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याचे वन विभाग अधिकारी पारधी यांनी सांगितले. घटनास्थळी बिबट्याची फक्त हाडेच उरलेली होती. रेस्क्यू टीमचे युनूस मणेर व साथीदारांनी बिबट्याची हाडे एकत्र करून विच्छेदनासाठी इस्लामपूर वनविभाग कार्यालयात घेऊन गेले.