पलूसमधील पोषण आहारात मृत साप; ठेकेदारावर कारवाई करा, विश्वजित कदम यांनी सरकारला धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 06:24 PM2024-07-04T18:24:15+5:302024-07-04T18:24:44+5:30
विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईच्या सूचना
कडेगाव : पलूस येथील कृषीनगरच्या अंगणवाडी क्रमांक ११६ मधील शालेय पोषण आहारात सापाचे मृत पिल्लू सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. ठेकेदार कंपनीची चौकशी करून कारवाईची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला याप्रश्नी कारवाईच्या सूचना केल्या.
कदम म्हणाले, पाेषण आहाराबाबत सातत्याने तक्रारी आहेत. पाेषण आहारात सापाचे मृत पिल्लू सापडणे, हा गंभीर प्रकार आहे. यामुळे गरोदर माता, तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा प्रकारामुळे आपण त्या मुलांच्या व मातांच्या आयुष्याशी खेळतोय का? असा प्रश्न निर्माण हाेत आहे. यापूर्वी पोषण आहाराच्या रूपात हरभरा, तांदूळ, तिखट, डाळी, असा कच्चा माल दिला जात असे.
परंतु, नवीन धोरणानुसार सर्व एकत्रित केलेला पॅक माल पुरविला जातो, हा माल पुरवण्याचा संपूर्ण राज्याचा ठेका एकाच कंपनीकडे आहे. त्यामुळे ते हा माल प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात किंवा अंगणवाडीत आल्यानंतर त्याची तपासणी होते का? दोन महिन्याचा माल एकाच दिवशी दिला जातो; पण तो पॅक माल दोन महिने राहतो का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारला धारेवर धरले. याबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी. या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी असणारे अधिकारी, कंपनी, ठेकेदार व अन्य कोणी यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी.
प्रकरण गंभीर : राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, विधिमंडळाचे सदस्य विश्वजित कदम यांनी सभागृहास दिलेली माहिती अतिशय गंभीर असून, शासनाने त्याची दखल घेऊन याेग्य ती कारवाई करावी.