शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी १२ जुलैपर्यंतची मुदत, अन्यथा रत्नागिरी-नागपूर महामार्ग रोखणार
By संतोष भिसे | Published: July 4, 2024 04:04 PM2024-07-04T16:04:33+5:302024-07-04T16:05:07+5:30
महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचा इशारा, बुधगाव येथे बैठक
बुधगाव : शासनाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय १२ जुलैपर्यंत घ्यावा, अन्यथा रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखण्यात येईल असा इशारा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. बुधगाव (ता. मिरज) येथे विठ्ठल मंदिरात बुधवारी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत आजपर्यंत झालेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी या महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला होता, पण शासनाने त्यावर ठोस निर्णय न स्पष्ट केला नाही. अधिवेशनानंतर चर्चा करण्यात येईल असे सभागृहात सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुधगावमधील बैठकीत शेतकऱ्यांनी तीव्र भावना वक्त केल्या. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर रत्नागिरी - नागपूर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेण्यासाठी शासनाला १२ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. निर्णय झाला नाही, तर बुधगाव येथेच पुन्हा एकदा बैठक घेऊन रास्ता रोको आंदोलनाचा दिवस ठरविण्याचे ठरले.
बैठकीत किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके,पै. विष्णू पाटील, यशवंत हारुगडे, अधिक पाटील, अनिल पाटील, घन:शाम नलवडे, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर निकम, प्रशांत पाटील, अमर पाटील, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील, दिनकर पाटील, श्रीकांत पाटील, जयप्रकाश पाटील, गजानन सावंत, प्रकाश टकले, शेरखान पठाण, एकनाथ कोळी आदींनी भूमिका मांडली.