पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत, दीड लाखावर लाभार्थी वंचित
By अशोक डोंबाळे | Published: September 3, 2022 12:46 PM2022-09-03T12:46:59+5:302022-09-03T12:47:28+5:30
मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणारे सहा हजारांचे तिन्ही हप्ते बंद होणार आहेत
सांगली : जिल्ह्यातील चार लाख ३६ हजार ६१५ पात्र लाभार्थ्यांपैकी दोन लाख ६७ हजार ७१० लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित एक लाख ६८ हजार ९०५ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे.
डॉ. दयानिधी म्हणाले की, केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यानसाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू आहे. पी.एम. किसान योजनेतून वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये लाभार्थ्यांना मिळत आहेत. हे हप्तेे पुढे चालू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ ही मुदत दिली होती.
या मुदतीमध्येही सांगली जिल्ह्यात एक लाख ६८ हजार लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. म्हणूनच शासनाने पुन्हा ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना दि.७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणारे सहा हजारांचे तिन्ही हप्ते बंद होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तालुकानिहाय लाभार्थी संख्या
तालुका एकूण लाभार्थी ई-केवायसी नसलेले
आटपाडी ३१९३४ १४१७०
जत ७३६६२ २५१४३
कडेगांव ३६९१९ १४०६०
कवठेमहांकाळ ३०५६२ १२३९७
खानापूर २७१३५ १३२२६
मिरज ५७८९६ २४९९९
पलुस २५६७२ १०००७
शिराळा ३७९१९ १२३८६
तासगांव ४४४६१ १७०९०
वाळवा ७०४५५ २५४२७