अवकाळीचा चाळीस हजार एकर द्राक्षबागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:59 PM2018-11-21T23:59:10+5:302018-11-21T23:59:15+5:30
तासगाव : सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका ...
तासगाव : सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका बसला आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षाबांगा घडकूज, दावण्याने वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षी द्राक्षबागायतदारांना नुकसानीचा सामना करावा लागला असून, सुमारे चार हजार कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागाला वादळी पावसाने झोडपले आहे. खानापूर, आटपाडी, तासगाव कवठेमहांकाळ, मिरज, पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. बुधवारी पाऊस झाला नसला तरी, दिवसभर ढगाळ वातावरण होते. दोन, तीन दिवसांपासून सकाळी दहापर्यंत द्राक्षबागेतील दव कायम राहिले आहे. ऐन द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने हा पाऊस द्राक्षबागांच्या मुळावर आला आहे. गेल्यावर्षी लवकर द्राक्षछाटण्या घेतल्या होत्या. त्यावेळी पावसामुळेच द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बहुतांश शेतकºयांनी आॅक्टोबर महिन्यात द्राक्ष छाटणी घेतली. मात्र आता तामिळनाडूतील वादळामुळे जिल्ह्यात झालेल्या पावसाने पुन्हा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के द्राक्षबागा फ्लॉवरिंग अवस्थेत आहेत. सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे बहुतांश बागांतून घडकूज, मणीगळ आणि दावण्या रोग दिसून येत आहे. त्यामुळे या द्राक्षबागा उद्ध्वस्त होणार आहेत. नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट झाले नसले तरी, आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पीक छाटणी झालेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसणार असून, सुमारे ४० हजार एकर द्राक्षबागांना अंदाजे चार हजार कोटींच्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
सलग दुसºया वर्षी निसर्गाचा प्रकोप
आगाप छाटणी घेतल्यानंतर चांगला दर मिळतो, या अपेक्षेतून बहुतांश द्राक्षबागायतदारांनी सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतली होती; मात्र गेल्यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे आगाप छाटण्या घेतलेल्या सर्व द्राक्षबागांचा हंगाम वाया गेला होता. त्यामुळे यावर्षी बहुतांश द्राक्षबागायतदारांनी आॅक्टोबर महिन्यात पीक छाटणी घेतली. मात्र याहीवर्षी पावसामुळे द्राक्षबागांना फटका बसला. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.