बचत गटांच्या पुरस्कारासाठी सौदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:33 PM2020-01-11T17:33:31+5:302020-01-11T17:34:31+5:30
बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या, उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बचत गटांना यंदा ाासनामार्फत हिरकणी पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुक्यातील दहा गटांना हा पुरस्कार मिळणार आहे. हे पुरस्कार जाहीर होण्याआधीच संभाव्य गटांतील महिलांशी संपर्क साधून पुरस्काराच्या रकमेतून २० ते २५ हजार रुपये देण्याची मागणी करून, पुरस्कारांसाठी सौदा करण्याचे कारनामे सुरू असल्याचे चर्चेत आले आहेत.
तासगाव : बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या, उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बचत गटांना यंदा शासनामार्फत हिरकणी पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुक्यातील दहा गटांना हा पुरस्कार मिळणार आहे. हे पुरस्कार जाहीर होण्याआधीच संभाव्य गटांतील महिलांशी संपर्क साधून पुरस्काराच्या रकमेतून २० ते २५ हजार रुपये देण्याची मागणी करून, पुरस्कारांसाठी सौदा करण्याचे कारनामे सुरू असल्याचे चर्चेत आले आहेत.
तासगाव तालुक्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कारभाराचे अनेक नमुने चव्हाट्यावर येत आहेत. ताुलक्यात सुमारे दोन हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून वीस हजारपेक्षा जास्त महिला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी संबंधित आहेत.
या बचत गटांना पाठबळ देण्यासाठी, आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी गावपातळीपासून ते तालुकास्तरापर्यंत शासनाकडून यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र या यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी सामान्य कुटुंबातील महिलांची लुबाडणूक करण्याचे उद्योग केले आहेत. महिलांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत, बचत गटांच्या नावावर कर्ज काढून पैसे घेतले गेले आहेत. हे पैसे परत कसे मिळणार? असा प्रश्न बचत गटांच्या महिलांसमोर आहे.
बचत गटांच्या माध्यमातून कर्ज काढून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांकडून पैसे घेऊन त्यांचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे, तर कर्तृत्वसंपन्न बचत गटांना राज्य शासनाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून पुरस्कार देण्याची अभिनव योजना जाहीर केली आहे.
चांगले काम असणाऱ्या गटांना शासनाकडून ५० हजार रुपयांच्या बक्षिसासह हिरकणी पुरस्कार देण्यात येत येणार आहेत. या पुरस्कारासाठी तासगाव तालुक्यातून सुमारे ३५ प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांची तालुकास्तरावरील समितीकडून छाननी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दहा गटांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करून हिरकणी पुरस्कार देणयत येणार आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे हे पुरस्कार लांबणीवर पडले होते. मात्र हे पुरस्कार अद्याप जाहीरही झालेले नाहीत. मात्र पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या काही बचत गटांतील महिलांशी पंचायत समितीतील एका प्रभाग समन्वयकाने संधान साधले.
तुम्हाला हिरकणी पुरस्कार देण्यात येईल, मात्र त्यासाठी तुम्हाला दहा ते वीस हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. काही महिलांनी पुरस्कार मिळणार असतील, तर पैसे देण्याची तयारी दर्शवली. हे पैसे मागताना, आणखी काही अधिकाऱ्यांनाही ही रक्कम द्यायची असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पुरस्कार मिळण्याआधीच बचत गटांकडून पैसे हडप करण्याचे कारनामे सुरु असल्याची चर्चा आहे.