सांगली मार्केट यार्डातील सौदे बंद; व्यापार मात्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:47+5:302021-04-15T04:25:47+5:30
सांगली : १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांगली मार्केट यार्डामधील गूळ, हळदीसह अन्य शेतमालाचे सौदे दि. १४ ते ३० एप्रिलपर्यंत ...
सांगली : १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांगली मार्केट यार्डामधील गूळ, हळदीसह अन्य शेतमालाचे सौदे दि. १४ ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. सौदे बंद असले तरी नियमित शेतीमालाची खरेदी व विक्री सुरू राहणार आहे, असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
सांगली मार्केट यार्डात हळद, गूळ, बेदाण्यासह अन्य शेतमालाची रोजची उलाढाल १४ ते १५ कोटीपर्यंत होते. बेदाणा, हळद, ज्वारी, गहू, हरभरा विक्रीचा हंगाम सुरू आहे. यावेळीच सौदे बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी खुले सौदे रद्द करून ई-नामव्दारे ऑनलाइन सौद्यासह व्यापार सुरू ठेवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बुधवारपासूनच खुले सौदे बंद केले आहेत. मात्र शेतमालाची खरेदी -विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक बाजारपेठेत माल घेऊन तो अन्य राज्यातील बाजारपेठेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती चेंबर ऑफ कॉर्मसचे अध्यक्ष शरद शहा यांनी दिली.
चौकट
बेदाण्याचे सौदे, व्यापार शंभर टक्के बंद : राजेंद्र कुंभार
काही बेदाणा व्यापारीही कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रसार होण्याची भीती आहे. यामुळे दि. १४ ते ३० एप्रिलपर्यंत बेदाणा सौदे बंद करत आहोत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तर तेथून पुढे बेदाणा सौदे काढण्याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.
चौकट
मार्केट यार्डातील व्यापार सुरू : शरद शहा
मार्केट यार्डातील हळद, गुळासह अन्य शेतमालाचे खुले सौदे बुधवारपासून रद्द केले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान नको म्हणून व्यापार सुरू ठेवणार आहे. एकाही शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणार आहोत, अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी दिली.