‘खोकी हटाव’च्या धक्क्याने वृद्धेचा मृत्यू
By admin | Published: January 20, 2015 12:14 AM2015-01-20T00:14:10+5:302015-01-20T00:22:05+5:30
आष्ट्यातील घटना : अधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ
आष्टा : अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या बुधवारपर्यंत खोकी काढण्याचा इशारा दिल्यानंतर खोके जाण्याचा धक्का सहन न झाल्याने येथील लक्ष्मीबाई बाळासाहेब यादव (वय ६५) या वृद्धेचा आज, सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्या मुलाचे केशकर्तनालयाचे खोके आहे. दरम्यान, आधी पुनर्वसन करा, मग खोकी काढा, अशी मागणी खोकीधारकांनी केली. यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाली. मात्र अधिकारी खोकी काढण्यावर ठाम असल्याने हा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत. आष्टा येथे सांगली रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर खोकीधारकांनी अतिक्रमण केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येत्या बुधवारी ही खोकी काढण्यात येणार असल्याची नोटीस अधिकाऱ्यांनी १२७ खोकीधारकांना दिली आहे. यामुळे खोकीधारकांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. खोकी काढू नयेत, अन्यथा आमचे संसार उद्ध्वस्त होतील, अशी विनंती त्यांनी केली.
नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी याप्रश्नी बांधकाम विभागाचे अभियंता बी. एल. हजारे, सहायक अभियंता एम. एम. गाताडे, मुख्याधिकारी अजित राऊत यांच्याशी चर्चा केली व खोकी काढू नयेत, असे निवेदन दिले. मात्र अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. कोठेही संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खोकीधारकांनी उद्यापर्यंत खोकी काढून घ्यावीत, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. या चर्चेतून कोणताही मार्ग न निघाला नाही. त्यामुळे आता खोकी निघणारच, हा धक्का सहन न झाल्याने आज दुपारी लक्ष्मीबाई यादव या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
ओ. के. हेअर ड्रेसर्सचे मालक दिलीप यादव यांच्या त्या मातोश्री होत. या घटनेमुळे खोकीधारक संतप्त बनले. त्यांनी व्यवसाय बंद ठेवून याचा निषेध केला.
पुनर्वसन करावे : शिंदे
नगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या की, खोकीधारकांची खोकी काढू नयेत, यासाठी आमचे प्रयत्न राहतील. या खोकीधारकांचे पशुवैद्यकीय रुग्णालय, एसटी बसस्थानक या जागेसह अन्य ठिकाणी पुनर्वसन करावे आणि मगच त्यांना हटवावे, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
सांगलीत आज बैठक
पंचायत समितीचे माजी उपसभापती वैभव शिंदे, खोकीधारक सुनील माने, शैलेश सावंत, संजय सावळवाडे, समीर लतीफ, अनिल भोसले, शीतल वग्याणी, राकेश सावळवाडे, विजय चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कुशवाह यांची भेट घेऊन खोकीधारकांचे पुनर्वसन करूनच खोकी काढावीत, या मागणीचे निवेदन दिले. यावर त्यांनी चर्चा करण्यासाठी उद्या, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली आहे.