मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचाही मृत्यू : सांगलीतील घटना, अपघाती धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 09:20 PM2018-04-30T21:20:05+5:302018-04-30T21:20:05+5:30
सांगली : वडिलांच्या अपघाताचा धक्का सहन न झाल्याने आशिष दिलीप वायचळ (वय २७) या अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सांगली : वडिलांच्या अपघाताचा धक्का सहन न झाल्याने आशिष दिलीप वायचळ (वय २७) या अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विश्रामबाग येथे वारणालीत विद्यानगरमधील गल्ली क्रमांक सहामध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर अवघ्या दोन तासात त्याचे वडील दिलीप वायचळ (वय ५९) यांचेही मिरजेत खासगी रुग्णालयात निधन झाले. एकाचदिवशी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने वारणालीत शोककळा पसरली.
दिलीप वायचळ यांचा तीन दिवसांपूर्वी मिरज-अंकली रस्त्यावरील रजपूत मंगल कार्यालयासमोर अपघात झाला होता. ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ते कोमात गेल्याने प्रकृती चिंताजनक होती. वडिलांच्या अपघाताचा धक्का आशिषला सहन झाला नाही. गेल्या दोन दिवसांपासून तो तणावाखाली होता. सोमवारी सकाळी डॉक्टरांनी आशिषसह वायचळ कुटुंबियांना बोलावून दिलीप वायचळ यांची प्रकृती उपचारास प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले. त्यानंतर आशिष घरी आला. तो दुसऱ्या मजल्यावरील स्वत:च्या खोलीत गेला. त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी काही नातेवाईक महिला घरी आल्या होत्या. त्या पहिल्या मजल्यावर बोलत बसल्या होत्या. दुपारी अडीच वाजता नातेवाईक महिला आशिषला जेवण करण्यास बोलाविण्यास गेली. त्यावेळी आशिषच्या खोलीच्या दरवाजा बंद होता. त्याला हाक मारली, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेजाºयांना बोलावून दरवाजा तोडल्यानंतर आशिषने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
संजयनगर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आशिषने ओढणीने छताच्या हुकाला गळफास घेतला होता. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. तोपर्यंत त्याचे वडील दिलीप वायचळ यांचेही निधन झाल्याचे वृत्त येऊन धडकताच नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. आशिषच्या आई व बहिणीने आक्रोश सुरू केला. काही नातेवाईक मिरजेला गेले, तर काहीजण सांगलीत थांबले. सायंकाळी आशिषवर, तर रात्री उशिरा त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आशिषची स्पर्धा परीक्षेची तयारी
आशिषने तीन वर्षांपूर्वी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. त्याचे वडील पाटबंधारे विभागात नोकरी करीत होते. गतवर्षी ते सेवानिवृत्त झाले होते. सध्या वडील जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर नोकरी करीत होते. वायचळ पिता-पुत्रात खूप प्रेम होते. आशिषने आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच त्याच्या मित्रांनी वारणाली परिसरात मोठी गर्दी केली होती.