बेळंकीत कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:15 PM2019-04-28T23:15:50+5:302019-04-28T23:15:57+5:30

सलगरे : बेळंकी (ता. मिरज) येथील गंगाटेक परिसरात म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पोहण्यास गेलेल्या राजाराम मऱ्याप्पा जाधव (वय ५०) व ...

Death of father-son in drowning in Belchkate canal | बेळंकीत कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

बेळंकीत कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

Next

सलगरे : बेळंकी (ता. मिरज) येथील गंगाटेक परिसरात म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पोहण्यास गेलेल्या राजाराम मऱ्याप्पा जाधव (वय ५०) व श्रेयस (१४) या पिता-पुत्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्यांच्या दुसºया मुलास जवळच असलेल्या क्रशरवरील कामगारांनी वाचविले. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली.
बेळंकी येथील निवृत्त सैनिक राजाराम जाधव हे आपली दोन मुले श्रेयस, अथर्व (वय १०) व अंकली येथील नातेवाईकांचा मुलगा मनोज गाडीवडर (७) यांच्यासह बेळंकी येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात पोहण्यासाठी आले होते. दुपारी चार वाजता ते श्रेयस व अथर्व यांच्यासोबत मुख्य कालव्यात पायºया असलेल्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरले, तर नातेवाईकांचा सात वर्षाचा मुलगा मनोज कालव्याच्या काठावरच थांबला होता.
सध्या म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने कालव्यात लांडगेवाडी येथील टप्प्यातून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे. या वाहत्या पाण्यात त्यांना पोहता येईना. मुले प्रवाहाने ओढली जाऊ लागली. हे लक्षात येताच राजाराम त्यांना घेऊन पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. याचवेळी एका हाताने अंशात्मक दिव्यांग असलेल्या श्रेयसने त्यांना पकडले. त्यामुळे राजाराम यांना पाण्याबाहेर पडता येईना. प्रवाहाची गती त्यांना पुढे ढकलत होती. त्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरू केली. हा प्रकार पाहून कालव्याच्या काठावर असलेल्या मनोजने आक्रोश केला.
बुडत असलेल्या बाप-लेकाच्या सोबत तो कालव्याच्या काठावरून तब्बल दीड किलोमीटरपर्यंत ‘वाचवा वाचवा’ असे ओरडत पळत होता. यादरम्यान कालव्यालगत असणाºया एका क्रशरवरील कामगार सुटी करून कालव्याजवळून जात होते. त्यांनी हा प्रकार पाहून मदतीसाठी धाव घेतली. एक लांब काठी घेऊन तिघांनाही पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण केवळ अथर्वच त्यांच्या हाती लागला. राजाराम व श्रेयस यांची हालचाल कमी झाली होती. दोघेही प्रवाहाबरोबर आणखी पुढे जाऊ लागले. काही अंतरावर राजाराम यांना बाहेर काढण्यात यश आले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. श्रेयस तसाच पुढे वाहत गेला. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरवाडी प्रकल्पाजवळ काही तरुणांनी धाडसाने पाण्यात उडी घेऊन त्याला बाहेर काढले. पण तोपर्यंत त्याचाही मृत्यू झाला होता.
दरम्यान, वाचलेल्या अथर्वला बेळंकी येथील ग्रामस्थांनी खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला सायंकाळी घरी सोडण्यात आले.
राजाराम हे माजी सैनिक होते. आठ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी सुनीता या गुंडेवाडी (ता. मिरज) येथे ग्रामसेविका आहेत. घटनेची माहिती पोलीस-पाटील चंद्रकांत पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती.

भोसेत कालव्यात बुडून वृध्दाचा मृत्यू
भोसे (ता. मिरज) येथे कालव्याच्या पाण्यात पडून बुडाल्याने तुकाराम रामचंद्र बन्ने (वय ६१, रा. भोसे) यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. तुकाराम बन्ने हे भोसेतील बनसारी ओढ्याजवळ डोंगरवाडी योजनेच्या कालव्याच्या परिसरात म्हैस चारण्यासाठी घेऊन गेले होते. म्हैशीचा कासरा त्यांनी आपल्या हाताला गुंडाळला होता. पाणी पाहून म्हैस कालव्यात धावत गेल्याने म्हैशीपाठोपाठ तेही कालव्यात खेचले गेले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढून त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात आणले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: Death of father-son in drowning in Belchkate canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.