शववाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:25+5:302021-04-30T04:32:25+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, दररोज ३० ते ३५ जणांचा कोरोनाने बळी जात आहे. अशा स्थितीतही शववाहिकेवरील ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, दररोज ३० ते ३५ जणांचा कोरोनाने बळी जात आहे. अशा स्थितीतही शववाहिकेवरील चालक स्वत:च्या जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. मृत्यूसोबतचा त्यांचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. दुसऱ्या लाटेत अजून एकालाही कोरोनाची बाधा झालेली नाही. महापालिकेकडून शववाहिका चालकांना आवश्यक ते सुरक्षा साहित्याचा पुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात १७५ रुग्णवाहिका आहेत. त्यातील ११५ रुग्णवाहिका या कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. यात १०८ रुग्णवाहिका २४ आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, मृत्यूचे प्रमाणही दिवसागणिक वाढत चालले आहे. १ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान ४०० जणांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर मिरजेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. सांगली-मिरजेतील मृतदेह या स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी सहा शववाहिकांची व्यवस्थाही महापालिकेकडून करण्यात आली आहे. शववाहिका चालकांना मास्क, पीपीई किट दिले जाते. वाहनाचे व चालकांचे सॅनिटायझेशनही केले जात आहे. तरीही मृत्यूसोबतचा हा प्रवास जोखमीचा आहे.
चौकट
कोट
वर्षभरापासून शववाहिकेवर चालक म्हणून काम करीत आहे. सुरुवातीच्या काळात भीती वाटत होती. पण सर्व ती खबरदारी घेतल्यास कोरोनाची बाधा होत नाही, हे लक्षात आले. महापालिकेकडून पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क दिले जाते. दिवसातून चार ते पाच फेऱ्या कराव्या लागतात. कोरोनाच्या आपत्तीत रुग्णसेवा केल्याचे समाधान आहे. - बापू माळी
चौकट
कोट
कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्याचे काम करीत आहे. गावाकडे कुटुंबीय राहतात. सहा महिन्यापासून गावाकडे गेलो नाही. या महामारीच्या काळात लोकांची सेवा महत्त्वाची आहे. या कामात जोखीम असली तरी आम्ही सर्व ती खबरदारी घेऊन काम करत आहोत. प्रशासनाकडूनही सुरक्षा साहित्य दिले जाते. - पोपट बनसोडे
चौकट
कोट
गेल्या सहा महिन्यापासून शववाहिकेवर काम करीत आहे. मृतदेहांची वाहतूक करावी लागते आहे. जिवाची पर्वा न करता काम करीत असलो तरी कुटुंबाची काळजी वाटते. घरी जाताना सर्व ती खबरदारी घेत आहोत. या कामात रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क येतो. धोका आहेच; पण सेवाही तितकीच महत्त्वाची आहे. - महादेव मजगे
चौकट
जिल्ह्यातील एकूण रुग्णवाहिकेची संख्या : १७५
अशी आहे आकडेवारी
चालक : ११५
कोविडसाठी : ११५
चालक : ६०
नाॅनकोविडसाठी : ६०