सांगलीत शोष खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू, महापालिकेविरोधात नातेवाईकांचा आक्रोश
By शरद जाधव | Published: November 25, 2023 09:01 PM2023-11-25T21:01:45+5:302023-11-25T21:02:15+5:30
शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
सांगली : शहरातील शामरावनगर येथील ज्ञानेश्वर कॉलनीत शोष खड्ड्यात बुडुन दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तहुरा राजू मुलाणी असे तिचे नाव आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. परिसरात सुरू असणाऱ्या गटारीच्या कामातील दिरंगाईमुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात आक्रोश केला. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजू मुलाणी हे कुटूंबियांसह शामरावनगरमधील ज्ञानेश्वर कॉलनीत राहण्यास आहेत. राजू मुलाणी यांना तहुरा ही एकुलती एक मुलगी होती. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास तहुरा घराबाहेर एकटीच खेळत होती. कुटूंबिय कामात व्यस्त असल्याने त्यांचेही तिच्याकडे लक्ष नव्हते. महापालिकेकडून सध्या शामरावनगर परिसरात गटारीचे काम सुरू केले आहे. ज्ञानेश्वर कॉलनीतही काम करणाऱ्या कंत्राटदाराने शोष खड्डा बांधला असलातरी तो उघडाच होता. तसेच गटारीची खोली मोठी असल्याने अगोदरच या भागातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तहुरा खेळत खेळतच या गटरीमध्ये पडली. गटारीची खोली आणि त्यातील पाण्यामुळे ती खाली गेली. नातेवाईकांनी ती कोठे दिसत नसल्याने शोध सुरू केला. याचवेळी त्यांच्या नातेवाईकांना तिचा ड्रेस गटारीत तरंगताना आढळला. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यातील पाण्यात शोध घेतला असता, तहुरा मृतावस्थेत आढळून आली.
महापालिका प्रशासनाने रेंगाळत काम ठेवल्यानेच ही वेळ आल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. महापालिकेकडून दिरंगाई झाल्यामुळेच एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाल्याने मुलाणी कुटूंबियांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.