आई पाठोपाठ मुलाचा मृत्यू, सांगलीतील कारंदवाडीत घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 13:06 IST2023-01-18T13:04:40+5:302023-01-18T13:06:17+5:30
आईच्या पाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर

आई पाठोपाठ मुलाचा मृत्यू, सांगलीतील कारंदवाडीत घडली दुर्दैवी घटना
सुरेंद्र शिराळकर
आष्टा: कारंदवाडी कृष्णानगर हाळ तालुका वाळवा येथे आईच्या मृत्यू पाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शहाबाई विलास पाटील (वय ६२) व शहाजी विलास पाटील (४३) अशी मृत माय-लेकरांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहाजी पाटील हे शेती बरोबर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. ते काही दिवसापासून निमोनियाने आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार करण्यात आले. मात्र, आतड्याला सूज आल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाच्या आजारामुळे आई शहाबाई सह कुटुंबीय काळजीत होते. मुलाच्या आजाराची धास्ती घेतल्याने शहाबाईंची प्रकृती खालावली. त्यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी (दि. १६) हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
दरम्यानच, आईच्या मृत्यूनंतर दोन तासात मुलगा शहाजी यांची मुंबईतील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. आईच्या पाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.