चुकीच्या उपचारांमुळे एसटी वाहकाचा मृत्यू, डॉक्टरने ११ लाख देण्याचे आदेश; सांगलीत ग्राहक मंचचा निर्णय
By संतोष भिसे | Published: September 28, 2024 04:25 PM2024-09-28T16:25:32+5:302024-09-28T16:25:48+5:30
येळापुरातील डॉक्टरविरोधात फिर्याद घेण्याचेही आदेश
सांगली : चुकीचे व अघोरी उपचार करुन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल तथाकथीत डॉक्टर प्रकाश बाळू मकामले (रा. कुंभारवाडी (येळापूर), ता. शिराळा) याने रुग्णाच्या वारसांना ११ लाख ६० हजारांची भरपाई देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक मंचाने दिले आहेत. डॉक्टरविरोधात फिर्याद नोंदवून कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.
प्रमोद गोकुळ गिरीगोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील मनीषा वनमोरे यांच्या पीठाने हा निर्णय दिला. वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना मखमले याने उपचार केल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. जालिंदर महादेव माळी या एसटी वाहकाला संधीवात व मणक्याचा आजार झाला होता. उपचारांसाठी ते कुंभारवाडी येथील प्रकाश किरण आयुर्वेदिक व ॲक्युप्रेशर केंद्रात उपचारांसाठी गेले. तेथे डॉ. मकामले यांनी बायो हेल्थ या उपकरणावर झोपविले. उपकरण सुरु केल्यानंतर माळी यांना मोठा त्रास झाला. लघुशंकाही झाली. डॉ. मकामले यांनी असे उपचार सातवेळा घ्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या फेरीवेळीही त्यांना त्रास झाला. डॉक्टरांनी घरी येऊन इंजेक्शने दिली तरी फरक पडला नाही.
त्यानंतरही डॉक्टरांनी तीन लाखांत खात्रीशीररित्या बरे करतो असे सांगितल्याने नातेवाईकांनी कर्ज काढून पैसे दिले. तरीही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी डॉक्टरविरोधात शिराळा पोलिसांत तक्रार दिली. पण पोलिसांनी तक्रार बेदखल केली.
यादरम्यान जालिंदर माळी यांच्यावर सांगली, कोल्हापूर व मिरजेत उपचार केले. पण उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी डॉक्टरविरोधात ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ॲड. आर. बी. पाटील व ॲड. पी. बी. पाटील यांनी त्यांची बाजू मांडली.
असे आहेत आदेश
मकामले याने मृताच्या वारसांना औषधोपचार व इतर खर्चापोटी ११ लाख रुपये ३० दिवसांत द्यावेत. पोलीस अधीक्षक व शिराळा पोलिस निरिक्षकांनी तात्काळ फिर्याद नोंदवून घ्यावी, पुढील कायदेशीर कारवाई करावी. जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्याधिकारी यांनी प्रकाश मकामले याचा वैद्यकीय परवाना व पदवीबाबत १५ दिवसांत न्यायालयात अहवाल द्यावा व योग्य कारवाई करावी. मृताच्या वारसांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून १० हजार रुपये मकामले यांनी द्यावेत.