सांगली जिल्ह्यातील कार्वे, इटकरेत दोन बिबट्यांचा मृत्यू; वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर
By श्रीनिवास नागे | Published: December 17, 2022 04:03 PM2022-12-17T16:03:53+5:302022-12-17T16:06:40+5:30
इस्लामपूर (जि. सांगली ) : वाळवा तालुक्यातील कार्वे आणि इटकरे या दोन गावात दोन नर जातीच्या बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे ...
इस्लामपूर (जि. सांगली) : वाळवा तालुक्यातील कार्वे आणि इटकरे या दोन गावात दोन नर जातीच्या बिबट्यांचामृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. शिराळा विभागाचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी ही माहिती दिली. वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांमुळे त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कार्वे येथील हणमंत महादेव माळी यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे सहा महिने वयाचा बिबट्या पडला. विहिरीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. दत्त टेकडी परिसरातील कार्यालयात या बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. अंबादास माडकर यांनी केले. यामध्ये पाण्यात बुडून या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत इटकरे येथील महामार्गालगत रवींद्र रघुनाथ पाटील यांच्या शेतात सडलेल्या अवस्थेमधील बिबट्याचा मृतदेह आढळून आला. पाच ते सहा दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. जागेवर शवविच्छेदन करण्यात येऊन तेथेच या बिबट्याचे दहन करण्यात आले. या घटनेत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
या दोन्ही ठिकाणी सांगलीच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे, वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने, शिराळ्याचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास माडकर, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांनी भेट देत माहिती घेतली.