पलूस तालुक्यातील जेष्ठ साहित्यिक प्रा. विठ्ठल सदामते यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 04:43 PM2022-04-06T16:43:59+5:302022-04-06T16:44:18+5:30
कथा, कविता, कादंबरी या तीनही क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या सदामते यांची एक समृद्ध साहित्यिक अशी ओळख होती.
सावंतपूर : पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. विठ्ठल जगन्नाथ सदामते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७० वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली.
१९५२ साली जन्मलेल्या सदामते यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेतले. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेतून प्राध्यापक म्हणून काम करून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या लेखनाला सुरवात केली. कथा, कविता, कादंबरी या तीनही क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या सदामते यांची एक समृद्ध साहित्यिक अशी ओळख होती.
वारणेची लेकरे, बिबट्या, भुरकेची शाळा, जरा ऐकतासा, झुंज आदी कथासंग्रह, सनईवाला, गुंताडा आदी कादंबऱ्या, तर एक दिवा हा कवितासंग्रह असे प्रा.सदामते यांचे विपुल साहित्य प्रकाशित आहे. त्यांच्या साहित्यलिखानासाठी आत्तापर्यंत ९ साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तर रिंगण, बुरकुल या दोन कादंबऱ्या, बेनवाड बबन हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. प्रा. सदामते यांनी अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना तसेच समिक्षणही लिहले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पलूस शाखेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी पत्नी असा परिवार आहे. त्यांचे रक्षाविर्सजन शुक्रवारी (दि.८) रोजी रामानंदनगर स्मशानभूमीत होणार आहे.