यशवंत कारखान्याच्या आंदोलनातील कामगाराचा मृत्यू; कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर
By अविनाश कोळी | Published: April 16, 2023 08:45 PM2023-04-16T20:45:33+5:302023-04-16T20:46:00+5:30
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि बँकेचे कर्ज फेडून घेतले.
विटा : थकीत पगाराच्या मागणीसाठी गेल्या सव्वादोन महिन्यांपासून विटा तहसील कार्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याच्या आंदोलनातील अत्यवस्थ झालेले अमृत यशवंत लोंढे (वय ६५, रा. वाळूज, ता. खानापूर) या कामगाराचा रविवारी सायंकाळी उपचारावेळी मृत्यू झाला.
विटा तहसील कार्यालयासमोर दि. १ फेब्रुवारीपासून थकीत पगाराचे आठ कोटी २८ लाख रुपये मिळावेत, या मागणीसाठी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. हे कामगार गेल्या सव्वादोन महिन्यांपासून आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनातील कामगारांपैकी अमृत लोंढे यांची प्रकृती शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी बिघडली. त्यांच्यावर विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि बँकेचे कर्ज फेडून घेतले. त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण ८ कोटी २८ लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे. वाळूज येथील कामगार अमृत लोंढे यांना गुरुवारी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या सहकारी आंदोलन कामगारांनी त्यांना त्यांच्या विट्यातील मुलाच्या घरी पाठवले. मात्र, त्यांना शुक्रवारी पहाटे पुन्हा त्रास वाढल्याने येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह आंदोलनास बसलेल्या यशवंत कारखान्याच्या कामगारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.