सांगलीत ‘डीजे’ने तरुणाचा मृत्यू, दुधारीतील गणेश मंडळाच्या ११ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 03:07 PM2023-09-29T15:07:32+5:302023-09-29T15:32:20+5:30

इस्लामपूर : पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विना परवाना गणेश विसर्जनाची मिरवणूक काढून ‘डीजे’ लावल्याबद्दल दुधारी (ता. वाळवा) येथील ...

Death of youth due to DJ in Sangli, case against 11 members of Ganesh Mandal in Dudhari | सांगलीत ‘डीजे’ने तरुणाचा मृत्यू, दुधारीतील गणेश मंडळाच्या ११ जणांविरुद्ध गुन्हा

संग्रहित छाया

googlenewsNext

इस्लामपूर : पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विना परवाना गणेश विसर्जनाची मिरवणूक काढून ‘डीजे’ लावल्याबद्दल दुधारी (ता. वाळवा) येथील त्रिमूर्ती मंडळाच्या ११ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘डीजे’च्या दणदणाटानंतर दुधारी येथील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी केवळ विना परवाना मिरवणूक काढली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमजान अल्ताफ मुल्ला, उत्तम वसंत कुंभार, दीपक रामचंद्र कांबळे, योगेश मधुकर गोतपागर, संकेत सूर्यकांत पाटोळे, तानाजी महादेव शिरतोडे, सुशांत पोपट पाटोळे, विशाल नामदेव बनसोडे, विनोद श्रीरंग पाटोळे, महेश जगन्नाथ दळवी (सर्व रा. दुधारी), सुरज कमरुद्दीन मुलाणी (वय २५, रा.बलवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कमरुद्दीन मुलाणी याने त्याचे ताब्यातील वाहन (एमएच ०९ ए ७७५१) मध्ये विना परवाना साऊंड सिस्टीम लावून सार्वजनिक उपद्रव करून व पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्रिमूर्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर सार्वजनिक उपद्रव केला. त्यामुळे सर्वांविरुद्ध हवालदार सचिन यादव यांनी कलम १८८,२९०, २९९, ३४ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३(र) (३) / १३१ प्रमाणे कायदेशीर तक्रार दिली आहे. सहायक निरीक्षक हरिशचंद्र गावडे पुढील तपास करीत आहेत.

‘डीजे’ वर तांत्रिक सोपस्कार

दुधारी येथील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. गुन्हा दाखल करताना या घटनेचा उल्लेख न करता केवळ परवाना न घेता डॉल्बीचा वापर केला असा उल्लेख फिर्यादीत केला आहे. तपास करण्याच्या दृष्टीने केवळ तांत्रिक पद्धतीने गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत.

Web Title: Death of youth due to DJ in Sangli, case against 11 members of Ganesh Mandal in Dudhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.