शाळाबाह्य खेळाडूंमुळे क्रीडा स्पर्धेत वाद
By admin | Published: January 21, 2015 10:41 PM2015-01-21T22:41:35+5:302015-01-21T23:49:56+5:30
महापालिका क्रीडा स्पर्धा : धावण्याच्या स्पर्धेत प्रकार
मिरज : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय वार्षिक क्रीडा स्पर्धेत मिरजेतील एका शाळेने धावण्याच्या स्पर्धेत शाळाबाह्य खेळाडू आणल्याचे निष्पन्न झाले. शाळेतील विद्यार्थी म्हणून भलतेच स्पर्धक दिसल्याने अन्यशिक्षकांनी याबाबत तक्रार केली. तक्रारीनंतर शाळाबाह्य खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. मिरज हायस्कूल मैदानावर सुरू झालेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत मिरजेतील २३ महापालिका शाळेतील दीड हजार विद्यार्थी सहभागी होते. कबड्डी, खो-खो, रिले, धावणे, लांबउडी या सांघिक व वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या. आज दुपारी धावण्याची स्पर्धा सुरू असताना मिरजेतील भारतनगर परिसरातील उर्दू शाळेच्या खेळाडू म्हणून दोन विद्यार्थिनी सहभागी होत्या. अन्य स्पर्धकांपेक्षा या मुली मोठ्या असल्याने काही शिक्षकांनी या स्पर्धक मुलींबाबत तक्रार केली. स्पर्धेच्या पंचांनी विचारपूस केली असता या मुली संबंधित शाळेच्या नसून, त्या दोघी बारावीतील असल्याचे निष्पन्न झाले. शाळाबाह्य स्पर्धक सहभागी झाल्याचे उघडकीस आल्याने स्पर्धेत गोंधळ उडाला. गोंधळातच दोन शाळाबाह्य धावपटू तेथून गायब झाल्या. संबंधित शाळेच्या संघास धावण्याच्या स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले.
क्रीडा स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंऐवजी शाळाबाह्य खेळाडू उतरविण्याच्या प्रकारामुळे महापालिका शाळांच्या शिक्षकांत वाद निर्माण झाला होता. संबंधित शाळेच्या खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर काढून प्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)
प्रकरण मिटविले
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. ए. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, बोगस खेळाडूंचे प्रकरण स्पर्धा समितीने त्यांच्या पातळीवर मिटविले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत माझ्याकडे तक्रार आलेली नाही; मात्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून खुलासा मागण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.