सांगली, मिरजेतील बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक
By admin | Published: January 16, 2017 12:34 AM2017-01-16T00:34:50+5:302017-01-16T00:34:50+5:30
एजंटाचे पलायन : आखाती देशात नोकरीचे आमिष
मिरज : आखाती देशात नोकरीच्या आमिषाने सांगली, मिरजेतील २५ ते ३० बेरोजगार तरुणांची एजंटाने फसवणूक केली आहे. परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी लाखो रुपये उकळून एजंटाने पलायन केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या सातजणांनी मिरज शहर पोलिसांत केली आहे.
मिरजेतील मेहबूब नामक एजंटाने दुबईत मॉलमध्ये ५० हजार रुपये पगारावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी ८० हजार ते १ लाख रुपये घेतले. मिरजेतील अशफाक शेख, अमिन नदाफ, मधू हंकारे, सांगलीतील रोहित शिंदे, सुनील शर्मा या पाचजणांना मेहबूब याने दि. १६ डिसेंबर रोजी मुंबईतील अन्य एका एजंटामार्फत दुबईला पाठविले. सर्वांना तीन महिन्यांच्या कालावधीकरिता पर्यटक व्हिसावर दुबईला पाठविले होते.
दुबईत गेल्यानंतर सर्वांना नोकरीसाठी व्हिसा मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दुबईत पोहोचल्यानंतर तेथील एजंटाने सफाई कामगार, हेल्पर या नोकरीसाठी १० ते १२ हजार पगार मिळेल, असे सांगून त्यांचा पासपोर्ट काढून घेतला. फसवणूक झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने मेहबूब याने दुबईतील एजंटाकडून माझीही फसवणूक झाल्याची बतावणी करून सर्वांना एका आठवड्यात परत आणले. मिरजेत आल्यानंतर तरुणांकडून घेतलेल्या रकमेपोटी धनादेश दिले. मात्र, हे धनादेश वटले नसल्याने मेहबूब याचा शोध घेतला असता, तो गेल्या आठवड्यापासून कुटुंबीयांसोबत घरातून गायब झाला आले.
भामट्या एजंटाचा मोबाईलसुद्धा बंद असल्याने नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या अशफाक शेख, रोहित शिंदे, अमिन नदाफ, मधू हंकारे, सुनील शर्मा, इम्रान पटेल (रा. मिरज), तोहिद मणेर (रा. बागलकोट) या सातजणांनी शहर पोलिसांत तक्रार केली. मेहबूब याने आणखी दहा ते पंधराजणांना नोकरीसाठी दुबईत पाठविले असून, त्यांचीही फसवणूक होऊन काहीजण तेथे अडकून पडल्याचे परत आलेल्या तरुणांनी सांगितले. आखाती देशात काही काळ नोकरी करून परतलेल्या महेबूब याने मिरजेत इंदिरानगर येथे दुकान थाटले होते. तेथे येणाऱ्या तरुणांना नोकरीच्या आमिषाने जाळ्यात ओढून फसवणूक केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून, अद्याप कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर