रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी डिसेंबर २०२४ ची डेडलाइन, सातारा-पुणेदरम्यान कामास विलंब; ठेकेदार पळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 02:29 PM2023-01-12T14:29:18+5:302023-01-12T14:29:51+5:30
दरम्यान, मिरज ते लोंढा सेक्शन मधील उर्वरित कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार
संतोष भिसे
सांगली : पुणे-मिरज-लोंढा या लोह मार्गाच्या दुहेरीकरणाची डेडलाइन दिवसेंदिवस पुढे सरकत आहे. सध्या डिसेंबर २०२४ ही मुदत निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, मिरज ते लोंढा सेक्शन मधील उर्वरित कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार असून,यामुळे मिरज ते बंगळुरू हा लोहमार्ग पूर्णत: दुहेरी होणार आहे.
सातारा ते पुणे दरम्यान डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असल्याने कामे मंदगतीने सुरू आहेत. यादरम्यान तीन ठिकाणी मोठे बोगदे आहेत. त्यालाही विलंब लागत आहे. आमले ते शिंदवणेचा अपवाद करता मिरज-पुणेदरम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरण डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मिरज ते पुणे संपूर्ण काम डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात भूसंपादनातील अडचणींमुळे कामे दीर्घकाळ रखडली. नव्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी जादा भावाने भरपाई मागितली,तर जुन्या मार्गासाठी १९७२ मध्ये जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांनीही अतिरिक्त भरपाईसाठी आग्रह धरला. प्रसंगी आंदोलनेही केली. त्याकाळी हा भाग सिकंदराबाद विभागाकडे अंतर्भूत असल्याने मध्य रेल्वेकडे भूसंपादनाची कागदपत्रेही नव्हती. यावर तोडगा काढण्यात बराच कालावधी वाया गेला.
पूर्ण झालेली कामे
- मिरज ते पाच्छापूर व पाच्छापूर ते बेळगाव सेक्शनमध्ये दुहेरीकरण,विद्युतीकरण
- सातारा ते कऱ्हाड दम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरण
- कराड ते मिरज दरम्यान शेणोली ते नांद्रे पूर्ण
अपूर्ण असलेली कामे
- मिरज-बेळगाव सेक्शन मधील पाच्छापूर व नजीकच्या तीन स्थानकात कामे अपूर्ण
- ही कामे येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करणार
- मिरज-पुणे सेक्शनमध्ये आमले ते शिंदवणे दरम्यान अपूर्ण
- पुणे ते नीरा व नीरा ते लोणंद दरम्यान काही कामे अर्धवट
- आदर्की ते सातारा दरम्यान कामे मंदगतीने
- कऱ्हाड ते मिरज सेक्शन मधील कऱ्हाड-शेणोली अपूर्ण
- नांद्रे ते सांगली व सांगली ते मिरज रखडले
- वाठार- पळशी- जरंडेश्वर पूर्ण होण्यास आणखी दोन महिने
- मिरज-सांगली-नांद्रे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करणार
ठेकेदार पळाला
सातारा ते पुणे दरम्यान तीन बोगद्यांची कामे सुरू आहेत. अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक काम ठेकेदाराला पेलले नाही. कामे अर्धवट ठेवून त्याने गाशा गुंडाळला. त्यामुळे रेल्वेने पुन्हा नव्याने निविदा काढून नवा ठेकेदार निश्चित केला आहे.