प्रत्येक प्रभागासाठी आता ४० सफाई कामगार सांगली महापालिका बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:02 AM2019-01-08T00:02:56+5:302019-01-08T00:03:30+5:30
महापालिकेकडील सफाई कामगारांच्या असमान वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गेल्या चार महिन्यांपासून आवाज उठविला होता.
सांगली : महापालिकेकडील सफाई कामगारांच्या असमान वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गेल्या चार महिन्यांपासून आवाज उठविला होता. सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी त्याला साथ दिली होती. अखेर प्रत्येक प्रभागासाठी समान ४० सफाई कामगार देण्याचा निर्णय सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येत्या ९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर संगीता खोत यांनी प्रशासनाला दिले.
महापौर खोत यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कामगार वाटपाबाबत महापालिकेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आयुक्त रवींद्र खेबूडकर, गटनेते युवराज बावडेकर, उपायुक्त मौसमी बर्डे, कामगार अधिकारी चंद्रकांत आडके, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्यासह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेच्या काही प्रभागात २० ते २५ सफाई कामगार होते, तर काही प्रभागात ७० हून अधिक कामगार काम करीत आहेत.
उपनगरे, विस्तारित भागात कामगारांची संख्या कमी असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडला होता. गेल्याच महासभेत काँग्रेसचे मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांच्यासह सदस्यांनी हातात फलक घेऊन आंदोलन केले होते. महापौरांनी सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार ही बैठक झाली.
बैठकीनंतर खोत म्हणाल्या की, सहायक मुकादम, ड्रेनेज, रुग्णालये व कार्यालयीन कामासाठीचे कामगार वगळता आरोग्य विभागाकडे सफाई कामासाठी ८८३ कर्मचारी शिल्लक राहतात. महापालिकेचे २० प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात ४० सफाई कामगार दिले जातील. उर्वरित ८३ कामगारांचे विशेष पथक तयार केले जाणार आहे. या पथकामार्फत आठवडा बाजार व इतर जादाची कामे करून घेतली जातील.
सध्या महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर लक्ष केंद्रित केले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्रीय पथक तपासणीसाठी येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात कसलाही विस्कळीतपणा होऊ नये, यासाठी ८ फेब्रुवारी रोजी कामगारांचे समान वाटप करण्यात येईल. महापालिकेच्या वर्धापनदिनादिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षात समान सफाई कामगार वाटपाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे स्पष्ट केले.
योगेंद्र थोरात म्हणाले की, या निर्णयामुळे मिरज शहरावरील अन्याय दूर होणार आहे. मिरजेत एकेका प्रभागात २३ कामगार आहेत. विस्तारित प्रभागातही कामगार कमी आहेत. या निर्णयामुळे प्रत्येक प्रभागाला किमान १७ कामगार वाढवून मिळतील. चार महिन्यांच्या संघर्षानंतर समान वाटपाबाबत यश मिळाल्याचे सांगितले. उपायुक्त मौसमी बर्डे म्हणाल्या की, शहर स्वच्छतेचे काम केवळ कामगारांवर टाकून चालणार नाही. त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छता ही लोकचळवळ बनण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, योगेंद्र थोरात, संगीता हारगे, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, गीता सुतार, कल्पना कोळेकर, सविता मदने, आरती वळिवडे आदी उपस्थित होते.
सफाईवर ८८३ कामगार
महापालिका क्षेत्राच्या स्वच्छतेसाठी ११०० कामगार आहेत. त्यात ६१० कायम, खास कामगार १४०, तर ३६० हे मानधनावरील आहेत. त्यापैकी ११५ कामगार कार्यालयात, १२ जण रुग्णालयात, ४५ जण ड्रेनेज विभागाकडे आहेत. ४० सहायक मुकादम व १५ प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सफाईच्या कामासाठी तीन शहरात ८८३ कामगारच उपलब्ध आहेत.
सातवा वेतन : कशासाठी हवा?- आयुक्त
नगरसेविका गीता सुतार यांनी काही सफाई कामगार केवळ दोन तासच काम करतात. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्त खेबूडकर यांनी सहमती दर्शविली. सफाई कामगारांना गणवेश दिले आहेत; पण एकजणही हा गणवेश घालत नाही. कामचुकार कामगारांना प्रशासनाचे कसलेही पाठबळ नसते. त्यांना कोण पाठबळ देतो? हे तपासा. कामगार संघटना आता सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करीत आहेत; पण कामगारांकडून महापालिकेला किती उत्पन्न मिळते? एक रुपयाही मिळत नसताना सातवा वेतन मात्र हवा आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला. कामचुकार कामगाराबद्दल थेट माझ्याकडे तक्रार करा, त्याला घरी घालवले जाईल, अशी ग्वाहीही दिली.