सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत निर्णय होईना; भाजपची नेतेमंडळी द्विधा मन:स्थितीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:16 PM2018-10-05T23:16:59+5:302018-10-05T23:17:05+5:30
सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काम सुरू ठेवा, वेळ आल्यावर निर्णय घेण्याचे सांगून परत पाठविले आहे, तर खासदार संजयकाका पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर सांगलीतील भाजपच्या नेत्यांची चार दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत वरिष्ठ नेते द्विधा मन:स्थितीत असल्याची चर्चा शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये रंगली होती.
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी बारा सदस्यांनी चार दिवसांपूर्वी बंड केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. बुधवारी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिका मांडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, आम्ही आदेश देत नाही, तोपर्यंत तुमचे काम सुरू ठेवा. योग्यवेळी निर्णय घेऊ, असे सांगून परत पाठवले.
त्यानंतर देशमुख यांनी लगेच जिल्हा परिषदेच्या कारभारात सहभाग घेतला. बदलाची मागणी करणाऱ्या काही सदस्यांनी शुक्रवारी देशमुख यांची भेट घेऊन, अध्यक्ष, उपाध्यक्ष कायम ठेवून उर्वरित सभापतींचे राजीनामे घ्यावेत आणि आम्हाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. देशमुख यांनी सांगितले की, पक्षाने आदेश दिला तर लगेच राजीनामा देण्यास तयार आहे. पदाला चिकटून बसणार नाही. पण, नेत्यांचा आदेश नसताना राजीनामा देणे चुकीचे आहे. त्याने नेत्यांच्या विश्वासाला तडा जाईल.
कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांनी गुरुवार, दि. ४ रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सोमवार अथवा मंगळवारी मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल. या बैठकीस तुम्हाला आणि जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनाही बोलावले जाईल. त्यावेळी सर्वांची मते जाणून घेऊन पदाधिकारी बदलाचे ठरवू, असे आश्वासन दिले. खा. पाटील यांनीच ही माहिती दिली.
जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत भाजपचे वरिष्ठ नेते द्विधा मन:स्थितीत आहेत. नेत्यांच्या या भूमिकेबाबत सदस्यांमध्ये शुक्रवारी उलट-सुलट चर्चा रंगली होती.
पदाधिकारी बदलाबाबत आग्रही असलेल्या सदस्यांनी सांगितले की, नेत्यांनी आमची भूमिका समजून घेऊनच निर्णय घ्यावा. येत्या चार दिवसात मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत काय भूमिका घेतात, त्यावरच पुढील वाटचाल ठरणार आहे. इच्छुक सदस्यांची ‘वेट अॅन्ड वॉच’ अशी भूमिका आहे.