निवृत्त कामगारांचा आंदोलनाचा निर्णय, सांगली वसंतदादा कारखाना : दिलेले सर्व पर्याय अमान्य; २६ डिसेंबरपासून बेमुदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:01 AM2017-12-19T01:01:55+5:302017-12-19T01:01:59+5:30
सांगली : विनाकपात संपूर्ण देय रक्कम मिळावी, या मागणीसाठी येत्या २६ डिसेंबरपासून वसंतदादा कारखान्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी निवृत्त कामगार संघर्ष कृती समितीच्या बैठकीत
सांगली : विनाकपात संपूर्ण देय रक्कम मिळावी, या मागणीसाठी येत्या २६ डिसेंबरपासून वसंतदादा कारखान्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी निवृत्त कामगार संघर्ष कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कारखान्याने दिलेले सर्व पर्याय समितीने अमान्य असल्याचे स्पष्ट केले.
वसंतदादा कामगार भवनात ही बैठक पार पडली. यावेळी के. डी. शिंदे म्हणाले, प्रशासनाने जाणीवपूर्वक निवृत्त कामगारांच्या देय रकमेत कपातीचा पर्याय ठेवला आहे. इतकी वर्षे देणी प्रलंबित ठेवताना पुन्हा त्यात कपात करून त्या पैशाचे हे नेमके काय करणार आहेत? कामगारांनी त्यांच्या हक्काचा पैसा सोडू नये. एक पैशाचीही कपात आम्ही होऊ देणार नाही. निवृत्त कामगारांची एकूण देय रक्कम ३० कोटी रुपये आहे. यातील ३० टक्के म्हणजे जवळपास १0 कोटी रुपये ते काढून घेणार आहेत. कारखान्याने दिलेला एकही पर्याय आम्हाला मान्य नाही. आम्हाला संपूर्ण रक्कम विनाकपात हवी आहे. तशी तयारी असेल तरच त्यांनी चर्चेला यावे अन्यथा आम्ही आमच्या हक्काचे पैसे कसे मिळवायचे, हे ठरवू.
गेल्या अनेक महिन्यांपासून निवृत्त कामगारांशी चर्चा करताना कारखाना प्रशासनाने आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. काही कामगारांना त्यांनी भूलविले आणि कपात करून रक्कम देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. इतकी वर्षे कामगारांना त्यांची रक्कम न देणारे प्रशासन केवळ कृती समितीच्या रेट्यामुळे देणी देण्यास तयार झाले आहे. त्यातही कपातीचा खोडा घातला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विरोध दर्शविला.
यावेळी घन:श्याम पाटील, श्रीकांत देसाई, विष्णू माळी, बाळासाहेब चव्हाण, कुमार माने, नरसगोंडा पाचोरे आदी चारशे निवृत्त कामगार यावेळी उपस्थित होते.
सेवानिवृत्तांची देणी देण्यास सुरुवात : संजय पाटील
वसंतदादा कारखान्याकडील २00२ पासून सेवानिवृत्त झालेल्या व राजीनामा दिलेल्या कामगारांची ग्रॅच्युईटी, रजेचा पगार आदी देणी धनादेशाद्वारे देण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. त्यात म्हटले आहे की, थकीत देणी मिळावीत म्हणून निवृत्त कामागारांकडून आंदोलने झाली. त्यानुसार अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडिया कंपनीचे संचालक जितेंद्र धारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी कामगारांशी चर्चा करून त्यांच्यासमोर विविध पर्याय ठेवण्यात आले. निवृत्त कामगारांनीही पर्याय मांडले. त्यापैकी कामगारांनी निवडलेल्या पर्यायानुसार ११ डिसेंबर रोजी विशाल पाटील यांच्याहस्ते धनादेश वाटपास सुरुवात झाली आहे. ही देणी कामगारांच्या पसंतीच्या पर्यायानुसार देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. ज्या कामगारांनी अद्याप त्यांची थकीत देणी नेली नाहीत, अशा कामगारांनी मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
वसंतदादा कामगार भवनात सोमवारी अॅड. के. डी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी घन:श्याम पाटील, श्रीकांत देसाई उपस्थित होते.