जिल्ह्यातील निर्बंधांबाबतचा निर्णय शासनाच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:19+5:302021-07-19T04:18:19+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती कायम राहिल्याने या आठवड्यातील निर्बंधाबाबत रविवारी निर्णय होऊ शकला नाही. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर असल्याने ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती कायम राहिल्याने या आठवड्यातील निर्बंधाबाबत रविवारी निर्णय होऊ शकला नाही. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर असल्याने निर्बंध कायम ठेवायचे की व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार सूट द्यायची याबाबतचा निर्णय आता सोमवारी होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री जयंत पाटील या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधाबाबत निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, रविवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील निर्बंधाबाबत पर्याय शोधण्याची सूचना केली तर निर्बंधाबाबत सर्वसमावेशक निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातील कोरोना स्थिती व उपाययोजनांबाबत रविवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक झाली. यात कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील कोरोनास्थिती, रुग्णालये व उपचाराच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली.
बैठकीत कोरोना रुग्णसंख्या स्थिर असल्याबाबत चर्चा झाली. सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जोरदार मागणी लावून धरल्याने त्याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष होते. बैठकीत यावर चर्चाही झाली. त्यात कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी कोरोना स्थिती कायम असली तरी प्रशासनाने पर्याय शोधावेत अशी सूचना केली. मात्र, जिल्ह्याची कोरोना स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याने व पाॅझिटिव्हिटी रेटही तुलनेने जादा असल्याने निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुनच निर्णय होणार आहे. रविवारी दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने व मुख्यमंत्रीही आढावा घेण्यात व्यस्त असल्याने पालकमंत्री पाटील सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतील अशी शक्यता आहे. शासनाशी चर्चा करुन निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. जिल्ह्यात सध्या अत्यावश्यक सेवांना दुपारी चारपर्यंतची परवानगी आहे.
चौकट
रुग्णसंख्या ठरतेय चिंताजनक
गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या कायम राहिली होती. उलट दोनवेळा नवीन बाधितांच्या संख्येने बाराशेचा टप्पा पार केला होता. नवीन रुग्णसंख्या सरासरी हजारावर कायम असतानाच, मृत्यूचे प्रमाणही कायम आहे. जिल्ह्यात दिवसाला सरासरी २० मृत्यूची नोंद होत आहे. महापालिका क्षेत्रासह वाळवा तालुक्यात रुग्णवाढ कायम राहिली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात कोरोनाला उतार लागलेल्या कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातही पुन्हा रुग्ण वाढत आहेत.