रस्त्यावरील आठवडा बाजार हटविण्याचा निर्णय

By admin | Published: April 26, 2016 11:54 PM2016-04-26T23:54:31+5:302016-04-27T00:44:01+5:30

जिल्हाधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक : प्रसंगी जमावबंदी; चौक, रस्ते रुंदीकरणावर झाडाझडती

Decision to remove market on the road | रस्त्यावरील आठवडा बाजार हटविण्याचा निर्णय

रस्त्यावरील आठवडा बाजार हटविण्याचा निर्णय

Next

सांगली : महापालिका हद्दीत रस्त्यावरच आठवडा बाजार भरविले जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यासाठी रस्त्यावरील आठवडा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेने पर्यायी जागेची व्यवस्था केल्यानंतर आठवडा बाजार हलविले जाणार असून, प्रसंगी बाजार परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्याची तयारीही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दर्शविली. येत्या महिन्याभरात आठवडा बाजार हटविण्याच्या कार्यवाहीला सुरूवात होणार आहे.
जिल्हाधिकारी गायकवाड यांनी मंगळवारी महापालिकेच्या रस्ता व चौक रुंदीकरण, विद्युत खांब स्थलांतरणाबाबत बैठक घेतली. या बैठकीला महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, प्रभाग सभापती बाळासाहेब काकडे, सभापती मृणाल पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील- मजलेकर, विष्णू माने, जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी, वाहतूक शाखेचे निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्यासह वीज महावितरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी चौक व रस्ता रुंदीकरणासह विविध विषयांवर बैठक घेतली होती. त्याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत रस्त्यावर भरणाऱ्या आठवडा बाजाराबाबतही चर्चा झाली. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आठवडा बाजार हलविले पाहिजेत, यावर सर्वांचेच एकमत झाले. महापौर शिकलगार यांनी, बाजार हलविताना त्यांना पर्यायी जागा द्यावी लागेल, त्यासाठी नगररचना विभागाने बाजाराच्या जवळच पर्यायी जागेची निश्चिती करावी. जागा निश्चित झाल्यानंतर बाजाराचे स्थलांतर करण्याची कार्यवाही हाती घ्यावी, अशी सूचना केली. जिल्हाधिकारी गायकवाड यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, जागा निश्चित झाल्यानंतर त्याची पाहणी करू, तेथे सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन आठवडा बाजार हलविण्यात येतील, महिन्याभरात ही कार्यवाही महापालिकेने पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच बाजार हटविताना होणारा विरोध लक्षात घेऊन, प्रसंगी कलम १४४ प्रमाणे जमावबंदी आदेशही लागू केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या ५० चौक व १५ रस्त्यांच्या रुंदीकरणावर बैठकीत चर्चा झाली. सांगली कॉलेज कार्नर, स्फूर्ती चौक, विजयनगर चौक या प्रमुख चौकांच्या रुंदीकरणासाठी तातडीने मार्किंग करण्याचे आदेशही त्यांनी दिले. बहुतांश चौकात अतिक्रमणे झाली आहेत. वीज वितरणचे खांब चौकाच्या मध्यावरच आहेत. दूरध्वनीचे खांबही तसेच आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. (वार्ताहर)+


मिरजेच्या नगररचनाचे अधिकारी मुर्दाड
जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या उपस्थितीत महिन्याभरापूर्वी झालेल्या बैठकीत ५० चौक व १५ रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत सद्यस्थितीचा अहवाल तयार करण्याचे आदेश महापालिकेच्या नगररचना विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार सांगलीच्या नगरचना विभागाने शहरातील चौक व रस्त्यांवरील अतिक्रमणे, भूसंपादनाबाबत कार्यवाही याबाबत छायाचित्रासह सादरीकरण केले. याउलट मिरजेच्या अधिकाऱ्यांनी काहीच अहवाल दिला नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील बैठकीपूर्वी चौक व रस्ता रुंदीकरणाचे मार्किंग करून सद्यस्थिती सादर करावी, अशी सूचनाही त्यांना करण्यात आली.

Web Title: Decision to remove market on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.