..अखेर सांगली जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली, एकरकमी ३१७५ रुपये देण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:12 PM2023-12-28T12:12:02+5:302023-12-28T12:12:33+5:30
कमी उतारा असणाऱ्या कारखान्यांसाठी ३१०० रुपये
सांगली : जिल्ह्यात अखेर ऊसदराची कोंडी फुटली असून पहिली उचल एकरकमी तीन हजार १७५ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कमी उतारा असणाऱ्या कारखान्यांनी तीन हजार १०० रुपये देण्याचा निर्णय झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धाेडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऊसदराच्या प्रश्नावर बैठक झाली. यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, दीपक मगदूम, आदींसह सर्व कारखान्यांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्याची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १२.५० उताऱ्यास प्रतिटन तीन हजार २५०, साडेबारा उताऱ्यापेक्षा कमी असणाऱ्या कारखान्यांनी तीन हजार १५० रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांनी तीन हजार १०० रुपये दर द्यावा, असा अंतिम प्रस्ताव दिला होता.
यावर कारखानदारांनी नकाराघंटा दाखवत पहिली उचल एकरकमी प्रतिटन तीन हजार १७५ रुपये आणि ११ टक्क्यांपेक्षा कमी साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार १०० रुपये दराचा तोडगा मान्य केला आहे. कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडगा मान्य केला आहे. यामुळे ऊसदराची कोंडी फुटली आहे.
साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार दुष्काळी भागातील आणि कमी उतारा असणारे कारखाने वगळले आहेत. उर्वरित कारखान्यांनी प्रतिटन पहिली उचल तीन हजार १७५ रुपये ऊसदर देण्याचे मान्य केले आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही कारखानदारांचा तोडगा मान्य केल्यामुळे ऊसदराचा प्रश्न सुटला आहे. - तृप्ती धोडमिसे, प्रभारी जिल्हाधिकारी, सांगली.
साखर कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ऊसदराची कोंडी फोडण्यात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यशस्वी ठरल्या आहेत. शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आम्ही त्यांचे आभार मानले आहेत. प्रतिटन एकरकमी तीन हजार १७५ रुपये दर मिळविण्यात संघटनेला यश आले आहे. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष.