चारा छावण्यांचा दोन दिवसात निर्णय
By Admin | Published: April 20, 2016 11:56 PM2016-04-20T23:56:37+5:302016-04-20T23:56:37+5:30
चंद्रकांत पाटील : सांगलीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेली टंचाई परिस्थिती लक्षात घेता, शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात मागेल त्या गावाला टॅँकर देण्याचे नियोजन करण्यात आले असून टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा छावणी सुरु करण्याचा निर्णय दोन दिवसात घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले. दरम्यान, आगामी खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खतांचा पुरवठा करण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. आगामी खरीप हंगाम व त्यावरील उपाययोजना याबरोबरच जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवरही चर्चा झाली.
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालल्याने शासनाने तातडीने त्याठिकाणी पाण्याची व खास करून चाऱ्याची सोय करण्याची मागणी आ. विलासराव जगताप यांनी बैठकीत केली. यावर पालकमंत्री पाटील यांनी, मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर हा विषय चर्चेला आला असून याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे सांगून, जिल्ह्यातील चारा छावणीचे प्रस्ताव आजच सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी जत तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्याची मागणी जगताप यांनी केली. जत तालुक्यातील माडग्याळ, सोन्याळ, बसर्गी या ठिकाणचे चारा छावणीचे प्रस्ताव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला, बोगस बियाणे, खताचे लिंकिंग रोखण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत, असा आरोप आमदार विलासराव जगताप यांनी केला. यावर जिल्हा कृषी अधिकारी आर. जे. भोसले यांनी, भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी औषध दुकानांची तपासणी करुन उपाय करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, यावर आमदारांचे समाधान झाले नाही.
कृषी विभागाच्यावतीने बैठकीत प्रसिध्द केलेल्या खरीप हंगाम नियोजन पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर द्राक्षबागेची पाहणी करीत असल्याचे छायाचित्र प्रसिध्द करण्यात आले आहे. यावर आमदार खाडे यांनी आक्षेप घेत, गुंडेवाडी (ता. मिरज) येथील ज्या द्राक्ष बागायतदाराला अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्याचे छायाचित्र वापरुन कृषी विभाग काय दर्शविण्याचा प्रयत्न करत आहे? असा सवाल केला. यावर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांचा आढावा जाणून घेतला. यावेळी म्हैसाळ योजनेचा आढावा देताना कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे यांनी सांगितले की, २० फेबु्रवारीपासून आवर्तन सुरु असून, आजअखेर ३ टीएमसी पाणी उचलण्यात आले आहे. वसुलीस प्रतिसाद मिळत आहे. जत तालुक्यातील तलाव भरल्यानंतर सांगोल्यास पाणी देण्याचे नियोजन आहे. यावेळी पंधरा दिवसानंतर सांगोल्यास पाणी देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. टेंभूच्या आढाव्यावेळी आटपाडी तालुक्याला पाणी मिळत नसल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले. यावर सांगोला भागानंतर आटपाडी तालुक्यालाही पाणी देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी योजनेतून पाणी देण्याऐवजी टॅँकरने पाणीपुरवठा करणे सोयीचे असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, अनिल बाबर, विलासराव जगताप, सुमनताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील फुलारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाणीटंचाई : मागेल त्या गावाला टँकर
जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता पाण्यासाठीची चोख उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मागेल त्या गावाला टॅँकर पुरविण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. चारा छावणीचा निर्णय दोन दिवसात घेण्यात येणार असून, त्यानंतर टंचाई परिस्थिती आटोक्यात येण्यास अडचण नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
१ मेपर्यंत एफआरपी द्यावीच लागेल : चंद्रकांत पाटील
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीच्या प्रश्नावर पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना १ मेपर्यंत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावीच लागेल, असे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी सांगितले की, कारखान्यांना दिलेल्या ८०:२० च्या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीची रक्कम देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल, असे सांगितले.