जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:49+5:302021-04-08T04:26:49+5:30
फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे अचानक गाव बंद केल्यानंतर व्यवसायिकांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्याकडे ...
फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे अचानक गाव बंद केल्यानंतर व्यवसायिकांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्याकडे कैफियत मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : सध्या कोरोनाची परिस्थिती भयानक होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यावर पर्याय म्हणून शासनाकडून कडक निर्बंध लावत वेगवेगळे पर्याय पुढे येत आहेत. परंतु कसबे डिग्रजसह परिसरातील गावांमध्ये पोलीस व प्रशासन अचानक ‘गाव बंद’ करतात आहे. या पार्श्वभूमीवर जनतेला विश्वासात घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी व्यक्त केले आहे.
बुधवार सकाळी कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे पोलीस आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील दुकाने बंद करण्यास सुरुवात झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दुकाने बंद करत असल्याची बातमी गावात पसरताच लोकांची तारांबळ उडाली. पूर्वसूचना न देता बंद करण्याचा निर्णय झाल्याने भाजीविक्रेते, छोटे-मोठे दुकानदार, पानपट्टी गॅरेज, व्यापाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्याकडे धाव घेऊन कैफियत मांडली.
शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. परंतु आम्हाला पूर्वकल्पना द्यावी, नियमावली आखून द्यावी, अशी मागणी लोकांनी केली आहे. विशाल चौगुले यांनी उपस्थित नागरिकांना सध्या कोरोनामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या होत असलेल्या भयानक परिस्थितीबाबत माहिती दिली. त्याचबरोबर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत सहकार्य करण्याची गरज असल्याचे उपस्थितांना सांगितले तसेच जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून नेमक्या कोणत्या बाबी बंद ठेवण्यात येणार आहेत, याबाबत माहिती घेतली जाईल तसेच ‘अत्यावश्यक सेवे’खाली येणाऱ्या ज्या बाबी असतील त्याबाबतही माहिती घेतली जाईल. त्यामुळे सध्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन हे सर्वसामान्यांच्या भावनांचा व मागणीचा विचार करून जनतेला विश्वासात घेत लॉकडाऊनबाबत निर्णय घेईल. असे आश्वासन विशाल चौगुले यांनी दिले.