सांगलीत विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी निर्णायक लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:21+5:302021-03-28T04:25:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतच होण्यासाठी निर्णायक लढ्याचा निर्धार विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. उपकेंद्रासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतच होण्यासाठी निर्णायक लढ्याचा निर्धार विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. उपकेंद्रासाठी महाविद्यालये, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण संस्था, संघटना यांचे ठराव घेण्यात येणार असून लढा आणखी तीव्र केला जाणार आहे.
उपकेंद्र कृती समितीची बैठक शनिवारी सांगलीत झाली. त्यामध्ये निमंत्रक ॲड. अमित शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उपकेंद्र जिल्ह्याच्या शहरापासून २५ किलोमीटरच्या परिघातच व्हायला हवे. त्यामुळे जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना ते सोयीचे ठरेल. उपकेंद्राबाबत शासनाने तत्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली पाहिजे. त्यासाठी प्रसंगी आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल.
विद्यापीठाचे सिनेट सदस्य विशाल गायकवाड म्हणाले की, उपकेंद्रासाठी भरीव एकमत होण्याकरिता सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षकांच्या व्यापक बैठका घेण्याची गरज आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम जाधव म्हणाले, उपकेंद्रासाठी न्यायालयात ई-पिटीशन दाखल करावी. ई-सह्यांची मोहीमदेखील राबवण्याची गरज आहे.
तेजस नांद्रेकर म्हणाले, उपकेंद्रासाठी गावाेगावी जनजागृती मोहीम राबवायला हवी. आकाश माने म्हणाले, विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून पाठिंब्याची पत्रे घ्यावीत.
दरम्यान, यासाठी शिक्षणमंत्री तसेच कुलगुरूंसोबत संयुक्त बैठकीचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना साकडे घालण्याचा निर्णय झाला.
बैठकीला जयंत जाधव, महालिंग हेगडे, अभिषेक खोत, तेजस सन्मुख, रोहित शिंदे, राहत सतारमेकर, ऐश्वर्या माने, वैष्णवी जाधव, स्नेहा कोरे, मिलिंद कांबळे, ऋषीकेश कांबळे, सौरभ हसुरे, आदित्य नाईक, तुळशीराम गळवे, अतुल फसाले, योगेश नाडकर्णी, हर्षवर्धन आलासे, जगदीश लिमये आदी उपस्थित होते.
चौकट
सोमवारपासून सर्व महाविद्यालयांमध्ये व्यापक जागृती केली जाणार आहे. लढ्यामध्ये लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्याचे ठरले.