Sangli- मणेराजुरीत शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको; कर्जमाफी, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:18 PM2023-09-14T12:18:29+5:302023-09-14T12:21:21+5:30
गुहाघर -विजापूर हा राज्य मार्ग ठप्प, बैलगाडीसह शेतकरी रस्त्यावर
दत्ता पाटील
तासगाव : दुष्काळ जाहीर करा, शेतीचे कर्ज माफी करा, अशा विविध मागण्यासाठी मणेराजूरी (ता . तासगांव ) बसस्थानक चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. बैलगाडी बैलासह रस्त्यावर आणून शासनाचा निषेध व्यक्त केला. यामुळे गुहाघर -विजापूर हा राज्य मार्ग ठप्प झाला आहे. वाहनांच्या मोठया रांगा लागल्या आहेत. दुष्काळाच्या मागणीसाठी मणेराजुरी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. तालुका कृषी अधिकारी यांनी ५५% पेरणी झाल्याचा चुकीचा अहवाल शासनास दिला आहे. मात्र प्रत्यक्षात २० ते २५% सुध्दा पेरणी झालेली नाही. त्यामुळे पीक पैसेवारी ५० पैसेच्या आत जाहीर कारावी. टंचाई निवारण योजनेतून गावीतील सर्व तलाव, शेततळे भरुन द्यावीत. ओढे व नाले यांना पाणी सोडून शेतक-यांना दिलासा द्यावा. जनावरांसाठी त्वरीत चारा छावण्या चालु कराव्यात.
शासनाने जाहिर केलेल्या प्रोत्साहन अनुदानाचे पन्नास हजारांचे अनुदान तात्काळ द्यावे. शेतक-यांचे वीज बिल व पाणी पट्टी माफ करावी. रोजगार हमीची कामे चालु करुन हाताला काम द्यावे. बारमाही बागायती पिकांना पीक विमा मंजुर करावा. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत म्हैशाळ, टेंभू, ताकारी, आरफळ या सिंचन योजना चालू ठेवाव्यात, यासह अन्य मागण्या मागण्यांसाठी मणेराजुरी ग्रामस्थांनी बस स्थानक चौकात राज्य महामार्गावर बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केले आहे.