पाच जिल्ह्यात इंधनाच्या मागणीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:33+5:302021-04-14T04:24:33+5:30
मिरजेत रेल्वेस्थानकाजवळ भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइलचे इंधन डेपो आहेत. मिरजेतून सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच ...
मिरजेत रेल्वेस्थानकाजवळ भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइलचे इंधन डेपो आहेत. मिरजेतून सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील पेट्रोलपंपांना इंधनाचे वितरण होते. पाच जिल्ह्यात भारत पेट्रोलियमचे २३० व इंडियन ऑइलचे १९० पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपांना भारत पेट्रोलियमकडून दररोज सुमारे १५ लाख व इंडियन ऑइलकडून १४ लाख लिटर इंधन पुरवठा सुरू होता. दोन्ही इंधन डेपोत सुमारे ५५ लाख लिटर पेट्रोल व १८० लाख लिटर डिझेल साठ्याची क्षमता आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना साथीची परिस्थिती व निर्बंधामुळे ही मागणी ७० टक्क्यांवर आली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात पूर्ण लाॅकडाऊनमुळे इंधनाचा खप ३० टक्क्यावर येऊन दोन्ही डेपो एक दिवसाआड सुरू ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर खप सुरळीत होण्याची प्रतीक्षा असताना गेल्या चार महिन्यात इंधन दरात मोठी वाढ झाल्याने इंधन वापर घटला आहे. आता व्यापारावर निर्बंधामुळे मागणी कमी असल्याने दोन्ही डेपोत इंधनसाठा शिल्लक आहे. इंडियन ऑइल डेपोत पुणे व गुजरातमधून, भारत पेट्रोलियम डेपोत मनमाड व लोणी काळभोर येथून रेल्वे टॅंकरमधून दररोज इंधन पुरवठा होतो. मात्र आता मागणी कमी असल्याने आठवड्यातून दोनदा रेल्वे टॅंकर येत आहेत. इंधन डेपोबाहेरील टँकरची गर्दीही कमी आहे. मार्च ते जूनअखेर सुट्टीच्या हंगामात पेट्रोल व डिझेलचा वापर वाढून इंधनाचा खप वाढतो. मात्र गेली दोन वर्षे सुटीच्या हंगामातच खप कमी होत आहे. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलचा खप आणखी कमी आहे. लाॅकडाऊनमुळे मेअखेरपर्यंत हीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याने इंधन कंपन्या व पेट्रोलपंपचालकांचे नुकसान होणार आहे.