चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट, वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 12:51 PM2023-12-04T12:51:46+5:302023-12-04T12:52:02+5:30
शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक पूर्णपणे ...
शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाल्याने दि. ३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले होते. या धरणातून वीजनिर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने गेल्या २९ दिवसांत एक टीएमसी पाणीसाठा कमी झाला होता. तर ३३ दिवसांत २.५९ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा १.१८ टीएमसीने कमी आहे. सध्या फक्त वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कॅनॉलमध्ये २५० तर नदीत ११५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी दिली होती. यामुळे १ ऑक्टोबरला चारही वक्राकार दरवाजे उघडले होते. पावसाने उघडीप दिल्याने दि.३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले होते. यानंतर फक्त वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. मात्र त्यानंतर पाण्याची आवक पूर्ण थांबल्याने वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबरपर्यंत एक टीएमसी पाणीसाठा कमी झाला होता. आता दि. ३ डिसेंबरपर्यंत एकूण ३.५९ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. यावर्षी धरण परिसरात आजअखेर १८८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या धरणाची ३३.४० टीएमसी क्षमता असून ३०.८१ टीएमसी (८९.५५ टक्के) तसेच उपयुक्त साठा २३.९३ टीएमसी (८६.९४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या दोन महिन्यांत ३.५९ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी हा साठा २५.११ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी १.१८ टीएमसी साठा कमी आहे.
आजची स्थिती
- एकूण पाणीसाठा क्षमता : ३४.४० टीएमसी
- धरण पातळी : ६२३.६५ मिटर
- धरण पाणी साठा : ३०.८१ टीएमसी ( ८९.५५ टक्के)
- उपयुक्त पाणीसाठा : २३.९३ टीएमसी (८६.९४ टक्के)
- एकूण पाऊस : १८८९ मिलिमीटर
- आवक : ००.०० क्यूसेक
- वीजनिर्मिती केंद्रातून : १४०० क्यूसेक
- यातील कालव्यातून : २५० क्यूसेक
- नदीपात्रात : ११५० क्यूसेक.