आघाडी सरकारमुळे सिंचन क्षेत्रात घट
By admin | Published: June 21, 2015 11:20 PM2015-06-21T23:20:33+5:302015-06-22T00:14:20+5:30
शिवाजीराव नाईक : शिवणीत कार्यक्रम
वांगी : कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसिंचन योजनांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे जलसिंचनावर मोठा खर्च होऊनही सिंचन क्षेत्र कमी झाले. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीला लोकांनी बाजूला केले. हे परिवर्तन लोकशाहीमुळे शक्य झाले असल्याचे मत शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले. शिवणी (ता. कडेगाव) येथे जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी आ. पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, ताकारी व टेंभू योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. आधुनिक ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संग्रामसिंह देशमुख यांनी गट-तट बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. महेश पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रामभाऊ पवार, भानुदास पडळकर, दीपक पाटील, संजय घोरपडे, शंकर मोहिते, शेखर मोरे, लक्ष्मण कणसे, महेंद्र करांडे, राजाराम कुंभार उपस्थित होते. (वार्ताहर)