महापालिका क्षेत्रातील पाॅझिटिव्हीटी दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:16+5:302021-07-02T04:19:16+5:30
वाळवा तालुक्यासह महापालिका क्षेत्रात कोरोना पाॅझिटिव्हिटी दर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले. त्याचा परिणाम आता दिसून ...
वाळवा तालुक्यासह महापालिका क्षेत्रात कोरोना पाॅझिटिव्हिटी दर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले. त्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. १५ ते १८ जूनदरम्यान महापालिकेचा पाॅझिटिव्हिटी दर २० ते २३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर महापालिकेने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या. रॅपिड अँटिजन चाचण्यांचे प्रमाणही वाढविले. त्यामुळे लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात मदत झाली. सध्या आरपीटीपीआरचा पाॅझिटिव्हिटी दर १०.५ टक्के तर अँटिजन चाचण्यांचा पाॅझिटिव्हीटी दर ४.८५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. महापालिकेकडून दररोज २८०० ते ३००० हजार चाचण्या केल्या जात आहेत.
जून महिन्यात उच्चांकी २२ हजार ९२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४ हजार ४७९ कोरोना रुग्ण सापडले. वेळीच चाचण्या झाल्याने संसर्गही कमी झाला. महापालिका क्षेत्राचा मृत्युदरही कमी झाला असून सध्या १.९ टक्के इतका आहे. शहरात १७३५ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यातील १२३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
चौकट
लहान मुलांसाठी ५० बेडची स्वतंत्र व्यवस्था
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून प्रशासनाने आतापासून तयारी सुरू केली आहे. मिरज तंत्रनिकेतनमधील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र ५० ते ६० बेडची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. लहान मुलांसह एका व्यक्तीला त्याच्यासोबत राहण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. लहान मुलांवरील उपचारासाठी मिरज मेडिकल काॅलेजच्या डाॅक्टरांचीही मदत घेणार असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.
चौकट
ऑक्सिजन प्लाॅट २५ दिवसांत कार्यान्वित
महापालिकेच्यावतीने मिरज तंत्रनिकेतनमधील कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन प्लांट उभारला जाणार आहे. त्याची वर्कऑडर दिली आहे. सिव्हिल वर्कचे काम सुरू आहे. येत्या २५ दिवसांत हा प्लांट कार्यान्वित होईल, असेही कापडणीस म्हणाले.