भूजल पातळीत दीड फुटाने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:44 PM2019-04-26T23:44:02+5:302019-04-26T23:44:07+5:30

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात पावसाचे कमी झालेले प्रमाण व बेसुमार पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भूजल ...

Decrease in water level to one and half feet | भूजल पातळीत दीड फुटाने घट

भूजल पातळीत दीड फुटाने घट

googlenewsNext

शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात पावसाचे कमी झालेले प्रमाण व बेसुमार पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वेगाने घटत असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच वर्षापासून दरवर्षीच ही पातळी घटत चालली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी दीड फुटाने घट झाली असून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या तालुक्यातील घट वेगाने वाढत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनने दगा दिल्याने जिल्ह्यातील पर्जन्यमानातही घट जाणवत आहे. यंदाही पावसाची सरासरी गाठली नसल्याने नैसर्गिक संकट वाढत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पाणी योजनांतून आवर्तन सुरू असून त्याचा फायदाही होत आहे. मात्र, पाऊसही कमी आणि योजनांचे पाणी न पोहोचलेल्या भागातील भूजल पातळी घटतच चालली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार करण्यात आला आहे. विभागाच्यावतीने वर्षात किमान चारवेळा भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. मार्च महिन्यातील अहवालानुसार जिल्ह्यात जत तालुक्यातील भूजल पातळीत सव्वा मीटरने घट झाली आहे. त्यानंतर आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातही हेच संकट निर्माण झाले आहे.
पावसाने अथवा जलस्रोतांच्या माध्यमातून जमिनीत मुरलेल्या पाण्यापेक्षा जादा पाण्याचा वापर झाल्यानेच भूजल पातळीत घट नोंदविली आहे. ज्या भागात म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेचे पाणी पोहोचले आहे, त्या ठिकाणी मात्र, पाणी पातळी स्थिर असली तरी ती समाधानकारक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाऊस नाही, त्याच भूगर्भातील पाण्याचाही बेसुमार उपसा होत असल्यानेच हे संकट निर्माण झाले आहे. शहरात पाण्याचा बेसुमार अपव्यय होतो आहे, तर त्याचवेळी ग्रामीण भागात घागरभर पाण्यासाठी मैलोन् मैलची भटकंतीही करावी लागत आहे. प्रशासनाच्यावतीने जनजागृती करण्यात येत असली तरी नागरिकांना त्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्याच्या पाऊसमानाचा विचार केला, तर मान्सूनवर भरवसा असला तरी त्याचेही प्रमाण घटतच चालले आहे. त्यात जत, आटपाडीसह काही भागाला परतीच्या मान्सूनवर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी टॅँकरसह इतर उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या असल्या तरी जिथे निसर्गच कोपला आहे, तिथे प्रशासनाचीही हतबलता होत आहे. बांधबंदिस्तीकरण व जलयुक्त शिवारसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीच निसर्गाच्या संकटाशी दोनहात करण्यास उपयोगी ठरणार आहेत.

मे महिन्यातही पडताळणी
विभागाच्या नियोजनाप्रमाणे वर्षातून चार वेळा पाणी पातळी निरीक्षण अहवाल तयार केला जातो. यावरच दुष्काळी उपाययोजना ठरविल्या जातात. मे महिन्यात पुन्हा पडताळणी होणार आहे.

सधन तालुक्यातही भूजल पातळी घटली
जिल्ह्यातील सधन तालुका असलेल्या वाळवा तालुक्यातील भूजल पातळीत यंदाही घट झाली आहे. या भागात उसाचे क्षेत्र मोठे असून उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याऐवजी बेसुमार वापरामुळेच हे संकट निर्माण झाले आहे. वाळवा तालुक्याबरोबरच पलूस तालुक्यातील पाणी पातळी स्थिर असली तरी, त्यातही घट जाणवली आहे. शिराळा तालुक्यातील जलस्रोत समाधानकारक आहेत.

Web Title: Decrease in water level to one and half feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.