कोयनेतून विसर्ग कमी केल्याने कृष्णेची पातळी घटणार
By अशोक डोंबाळे | Published: June 10, 2023 05:47 PM2023-06-10T17:47:00+5:302023-06-10T17:48:12+5:30
जलसंपदाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन
सांगली : कोयना धरणामध्ये सध्या केवळ १२.६३ टीएमसी म्हणजे १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणून कोयना धरण प्रशासनाने धरणातील विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी होणार आहे. पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा कमी होणार असल्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
सध्या पाऊस लांबला असून, धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. मान्सूनचे आगमन होईपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण ताकारी, टेंभू उपसा सिंचन योजना आणि नदीकाठच्या मोठ्या सिंचन योजना, पिण्यासाठी आठवड्याला एक टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. पाऊस खूपच लांबला तर धरणातील पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच आहे. म्हणून मान्सून पावसाचा जोर वाढेपर्यंत कोयनेतील पाणी जपून वापरावे लागणार आहे, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. म्हणूनच कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी सध्या कमी केले आहे. केवळ एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी प्रचंड कमी होणार आहे.
महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे : ज्योती देवकर
पावसाळा लांबल्यामुळे व काही तांत्रिक कारणांमुळे कोयना धरणातून पुढील ४ ते ५ दिवस केवळ १०५० क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे. यामुळे कृष्णा नदीवरील खाजगी उपसा व टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनादेखील सुरू आहेत. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळी पुढील काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून महापालिका प्रशासनाने सांगली शहरातील पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे पत्र सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी महापालिकेला पाठविले आहे.
कमी पाण्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न
कृष्णा नदीत सध्या खूपच कमी पाणीसाठा असल्यामुळे पाणी प्रचंड दूषित झाले आहे. पाण्याला वास येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी दक्षता घ्यावी, प्रसंगी उकळूनच घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.