Sangli: बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट, तक्रारीनुसार चौकशी सुरू
By अविनाश कोळी | Published: April 18, 2023 07:17 PM2023-04-18T19:17:49+5:302023-04-18T19:18:20+5:30
ग्राहकाने सोने तारण ठेवून ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कवठेएकंद शाखेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आढळून आली. त्यामुळे ग्राहकाने याबाबतची तक्रार बँकेकडे केल्यानंतर मुख्य शाखेतील अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रत्यक्ष शाखा कार्यालयात जाऊन दिवसभर प्रकरणाची चौकशी केली.
बँकेचे ग्राहक विश्वासराव माधवराव पाटील यांनी कवठेएकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती. १२ एप्रिल रोजी त्यांनी दागिना सोडविल्यानंतर त्यात घट झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार कवठेएकंद, तासगाव तसेच सांगली शाखेकडे केली. बँकेचे कर्मचारी, सराफ यांच्या समक्ष दागिन्याच्या वजनाची तपासणी केल्यामुळे ही बाब समोर आली. हे प्रकरण सुरू असतानाच आणखी एका कर्जदार ग्राहकानेही बँकेमध्ये गहाण ठेवलेल्या दोन पिळ्याच्या अंगठीचे वजन कमी भरल्याची तक्रार केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा बँकेच्या मुख्यालयातून अधिकाऱ्यांना चौकशीकरिता कवठेएकंद शाखेत पाठविण्यात आले. याठिकाणी त्यांनी दिवसभर चौकशी केली. सराफाशी चर्चाही केली. त्यानंतर आता अधिकारी बुधवारी याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्याची शक्यता आहे. सोन्यात कशामुळे घट आली, त्याची कारणे काय, कोणाचा त्यात हस्तक्षेप आहे का, या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.
दागिन्यांत ४८० मिलिग्रॅमची घट
ग्राहकाने दहा ग्रॅमची अंगठी बँकेत तारण ठेवून ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. १२ एप्रिल रोजी कर्ज परतफेड करून दागिना ताब्यात घेतला. बँकेशेजारीच असणाऱ्या ज्वेलर्स दुकानात अंगठीचे वजन केले असता ४८० मिलीग्रॅमने वजन कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच शाखेकडे तक्रार केली, मात्र कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे तक्रारदाराने सांगितले.
जिल्हा बँकेच्या कवठेएकंद शाखेतील सोने गहाण प्रकरणाबाबत तक्रार आली होती. त्यानुसार चौकशी करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल अद्याप माझ्याकडे आलेला नाही. अहवाल पाहून पुढील कार्यवाही होईल. - शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बँक