डी.एड्., बी.एड्. धारकांचा शासनाने अंत पाहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:37 AM2019-01-22T00:37:26+5:302019-01-22T00:38:47+5:30
राज्यभरात शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, शासनाकडून भरतीविषयी केवळ आश्वासन देण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीची केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्याअगोदर भरती पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाने डी.एड्.,
सांगली : राज्यभरात शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, शासनाकडून भरतीविषयी केवळ आश्वासन देण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीची केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्याअगोदर भरती पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाने डी.एड्., बी.एड्.धारक तरूणांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र लढा उभारण्याचा इशारा डी.एड्., बी.एड्. स्टुडंट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष संतोष मगर यांनी सोमवारी सांगलीत दिला.
शिक्षक भरतीविषयी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, राज्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही तरूणांना बेरोजगार ठेवण्यातच शासन धन्यता मानत आहे. संघटनेने पाठपुरावा सुरू असल्याने भरती प्रक्रियेस गती मिळाली असली तरी, प्रत्यक्षात भरती झालेली नसल्याने तरूणांमध्ये अस्वस्थता आहे. शिक्षक भरती पारदर्शीपणे व गुणवत्तेनुसार व्हावी, यासाठी घेण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणीस दीड वर्षाचा कालावधी झाला आहे, टीईटी परीक्षेतून हजारो डी.एड्., बी.एड्. धारक तरूण गुणवत्ता सिध्द करत असतानाही, शासनाकडून त्यांच्या भावनेशी खेळ चालविला आहे.
बिंदुनामावलीचा विषय असो अथवा प्रशासकीय पातळीवर भरती, ही प्रक्रिया गतीने पूर्ण होण्यासाठी संघटनेने पाठपुरावा केला आहे. पुण्यातील शिक्षण संचालनालयासमोर आणि मंत्रालयासमोर संघटनेने वारंवार आंदोलन केल्याने प्रक्रिया गतीने सुरू असली तरी, अद्याप नियुक्तीचे आदेश मिळत नाहीत. त्यामुळे आता तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिते त्याअगोदर कोणत्याही परिस्थितीत जादा संख्येने शिक्षक भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाभरातून आलेले डी.एड्., बी.एड्. धारक तरूण, तरूणी उपस्थित होत्या.
पुण्यात आंदोलन
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, ३ फे ब्रुवारीपासून शिक्षक भरतीची जाहिरात येण्यास सुरूवात होईल, असे सांगितले आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. पण मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३१ जानेवारीपासून पुण्यात बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. ३ रोजी जाहिराती येण्यास सुरूवात झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचेही मगर यांनी सांगितले.
सांगली येथे शिक्षक भरतीसंदर्भात चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आयोजित बैठकीत संतोष मगर यांनी मार्गदर्शन केले.