‘वालचंद’च्या ताब्यावरून भाजपमध्ये जुंपली
By admin | Published: June 24, 2016 12:10 AM2016-06-24T00:10:14+5:302016-06-24T00:50:18+5:30
खासदार-जिल्हाध्यक्ष आमने सामने : दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
सांगली : प्रतिष्ठित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ताबा प्रकरणाला गुरुवारी वेगळेच वळण लागले. भाजपचे खासदार संजयकाका पाटील व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात ताब्यावरून वाद उफाळून आला आहे. खासदार गटाने महाविद्यालयाचा ताबा घेतल्यानंतर देशमुख यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली. दोन्ही गटाने मुख्यमंत्री व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे (एमटीई) अध्यक्ष असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी वालचंद महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. तत्पूर्वी महाविद्यालयात अजित गुलाबचंद यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळ कार्यरत होते. नियामक मंडळाने रितसर नेमलेले संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांची हकालपट्टी करून डॉ. देवमाने यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महाविद्यालयाचा ताबा पुन्हा परिशवाड यांच्याकडे सोपविला. यावेळी संजयकाका पाटील यांनी देशमुख यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला. देशमुख यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. प्रसंगी खासदारकी पणाला लावू, असा इशारा दिला. तर खा. पाटील यांना प्रत्युत्तर देताना देशमुख यांनी जोरदार टीका केली. खासदार पाटील हे अजित गुलाबचंद यांची सुपारी घेऊन काम करीत आहेत. त्यांना आताच वालचंदचा पुळका कसा आला? असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपमध्येच वालचंदच्या ताब्यावरून दोन गट पडले असून, त्यांच्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. (प्रतिनिधी)
सर्वपक्षीय : आंदोलन
खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महाविद्यालयाचा ताबा पुन्हा परिशवाड यांच्याकडे सोपविला. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. यासाठी तातडीने पोलिस दाखल झाल्यामुळे वातावरण शांत झाले.