दीपा मुधोळ-मुंडे सांगलीच्या नव्या जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 02:08 PM2022-06-30T14:08:38+5:302022-06-30T14:09:03+5:30
नव्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे २०११ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला.
सांगली : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून, दीपा मुधोळ-मुंडे यांची सांगलीच्याजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या उद्या, शुक्रवारी पदभार स्वीकारणार आहेत. बुधवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढण्यात आले.
नव्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे २०११ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली होती. तेथून औरंगाबाद येथे जीएसटी विभागात सेवा बजाविल्यानंतर त्यांनी धाराशिवच्या (उस्मानाबाद) जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. कोरोना कालावधीत त्यांनी सलग ३७ दिवस संपूर्ण जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये ठेवला होता. त्या सध्या संभाजीनगर येथे सिडकोच्या मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत होत्या.
मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. अत्यंत शिस्तप्रिय आणि संयमी अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही महिन्यांतच निर्माण झालेल्या महापुराच्या आपत्तीवेळी त्यांनी चांगले नियोजन केले. त्यानंतर दुसऱ्या वर्षीही महापुराच्या काळात त्यांनी उत्तम पद्धतीने परिस्थिती हाताळली होती.
कोरोना कालावधीत डॉ. चौधरी यांच्या कामाची राज्यभर प्रशंसा झाली होती. शेजारच्या सर्व जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढतच असताना, येथे मात्र ती नियंत्रणात ठेवत, कोणताही रुग्ण उपचाराविना राहणार नाही, यासाठी त्यांनी नियोजन केले होते. स्वत: डॉक्टर असल्याने नवीन कोविड केअर सेंटर, पायाभूत सुविधा, ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामुळे कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये उपचारांचे योग्य नियोजन केले होते. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करीत त्यांनी प्रशासनावर वचकही ठेवला होता.
बदलीबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. शुक्रवारी सांगलीत जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहे. - दीपा मुधोळ-मुंडे, नूतन जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील तीन वर्षांतील कालावधी संस्मरणीय असाच आहे. कोरोना कालावधीसह महापुराच्या आपत्तीत आव्हानात्मक काम केले. जिल्ह्यातील प्रत्येक घटकाने सहकार्य केल्याने तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला. - डॉ. अभिजित चौधरी, मावळते जिल्हाधिकारी