सांगली: कर्जबाजारी द्राक्षबागायतदाराची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 03:41 PM2022-08-03T15:41:57+5:302022-08-03T15:42:26+5:30
दोन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. उरल्यासुरल्या बागेतील द्राक्षाला दरही चांगला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्यवंशी आर्थिक विवंचनेत होते.
मिरज : सोनी (ता. मिरज) येथील दीपक सुबराव सूर्यवंशी (वय ४२) या द्राक्षबागायतदाराने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. द्राक्षबागेत नुकसान झाल्याने व कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (दि. २) दुपारी मणेराजुरी (ता. तासगाव) हद्दीतील शेतात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे सोनी परिसरात खळबळ उडाली आहे.
सोनी येथे कुमठे रस्त्यावर शेतात सूर्यवंशी पत्नी, मुलगा व मुलीसह राहत होते. त्यांची अडीच एकर द्राक्षबाग आहे. दोन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. उरल्यासुरल्या बागेतील द्राक्षाला दरही चांगला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्यवंशी आर्थिक विवंचनेत होते. बागेत उत्पन्न नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची याची चिंता लागून राहिली होती. उसातूनही उत्पन्न मिळाले नव्हते.
याच चिंतेतून त्यांनी सहा महिन्यांपूर्वी घरातच विष प्राशन केले होते. त्यावेळी कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला होता. असे कृत्य पुन्हा न करण्याविषयी कुटुंबीयांनी, मित्र व नातेवाइकांनी दीपक यांची समजवले होते.
सोमवारी (दि. १) ते जायगव्हाणला (ता. तासगाव) जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडले. त्यानंतर घरी परतले नाहीत. कुटुंबीय त्यांच्या प्रतीक्षेत होते. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मणेराजुरी येथे कोड्याच्या मळ्याजवळ दीपक यांचा मृतदेह आढळला. ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दीपक यांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
अडीच लाखांचे कर्ज
दीपक यांनी द्राक्षबागेसाठी बँकांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण गेल्या दोन वर्षात बागेचे मोठे नुकसान झाल्याने कर्ज फेडू शकले नव्हते. यातूनच निराश होऊन सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यांचा मृतदेह घराकडे आणल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला.