गुलगुजनाळ परिसरात फिरतंय हरीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:31+5:302021-06-17T04:18:31+5:30
संख : जत तालुक्यातील गुलगुजनाळ-कोंंतेवबोबलाद येथील वन विभागात, कर्नाटक सीमेलगतच्या कन्नुर, शिरनाळ परिसरात गेली दीड महिन्यांपासून कळपातून चुकून आलेले ...
संख : जत तालुक्यातील गुलगुजनाळ-कोंंतेवबोबलाद येथील वन विभागात, कर्नाटक सीमेलगतच्या कन्नुर, शिरनाळ परिसरात गेली दीड महिन्यांपासून कळपातून चुकून आलेले हरीण फिरत आहे. त्याला पाळीव कुत्रे, शिकारी कुत्रे यांचा त्रास होत आहे. त्याच्या जीवाला धोका आहेे. या हरणाला वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून ताब्यात घेण्याची गरज आहे.
गुलगुजनाळ-कोंंतेवबोबलाद वन विभागात, कर्नाटक सीमेवरील कन्नुर, शिरनाळ हद्दीतील ब्रम्हणापूर उपसा सिंचन परिसरात नर हरीण गेली दीड महिन्यापासून फिरत आहे. कळपातून हरीण चुकून आले असावे.
कर्नाटकातील मठात हरीण पाळले असून, तेथून पळून आले असावे. पूर्व भागातील मेंढपाळ चाऱ्यासाठी फेब्रुवारी महिन्यात लातूर, सोलापूर येथील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर,कर्नाटकातील गुलबर्गा परिसरात काळ्या रानात दरवर्षी जातात. त्या परिसरातील हरीण कळपातील माजावर आलेल्या शेळ्या-मेंढ्या बरोबर आले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.
गुलगुजनाळ-कोंंतेवबोबलाद, कन्नुर, शिरनाळ सीमेवर दररोज मेंढपाळ करणाऱ्यांंना चारा खाताना दिसते. शेळ्या-मेंढ्या जवळ येते. माणसांची चाहूल लागताच जोरात लांब पळून जाते. या भागात झाडांची संख्या कमी आहे.
उजाड माळरानाचा भाग असल्याने हरणाच्या जिवाला धोका आहे. परिसरातील पाळीव कुत्रे व शिकारी कुत्रे त्याचा पाठलाग करतात. भित्रा प्राणी असल्याने परिसरात दररोज धावपळ करताना दिसत आहे. त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
चौकट
गुलगुजनाळ -कोंंतेवबोबलाद फाॅरेस्टमध्ये गेली दीड महिन्यांपासून हरीण फिरत आहे. कुत्री, अज्ञात व्यक्तीकडून शिकार होण्याची शक्यता आहे. धोका होऊ नये म्हणून वन विभागाने दक्षता घेऊन ताब्यात घ्यावे, अशी मागणी शेतकरी परशुराम मोरे, उमाजी माने यांनी केली आहे.