मिरज-बेडग रस्त्यावर मृतावस्थेत हरीण सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:19+5:302021-07-09T04:17:19+5:30
टाकळी : मिरज तालुक्यातील मिरज-बेडग रस्त्यावरील गणेशबाग येथे गुरुवारी पहाटे हरीण मृतावस्थेत आढळून आले. वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू ...
टाकळी : मिरज तालुक्यातील मिरज-बेडग रस्त्यावरील गणेशबाग येथे गुरुवारी पहाटे हरीण मृतावस्थेत आढळून आले. वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. शवविच्छेदनासाठी ते सांगलीला पाठविले आहे. याचा अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.
गुरुवारी पहाटे मिरज-बेडग रस्त्यावरील गणेशबाग कोरेवस्ती परिसरात नागरिक फिरायला गेले होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला हरीण मृतावस्थेत आढळून आले. नागरिकांनी तत्काळ वन विभागाला याची माहिती दिली. उपवन संरक्षक विजय माने, सहायक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार व युवराज पाटील, वन्यजीव मानद रक्षक अजित पाटील, वनरक्षक सागर थोरव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहाणी करून हरणास ठोकरून गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी श्वानपथकास पाचारण केले. घटनास्थळापासून बेडगच्या दिशेने शंभर फुटापर्यंत माग काढून ते घुटमळले. मृतावस्थेतील हरणास ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आठवड्याभरापूर्वी कवठेमहांकाळ येथे हरीण आढळून आले होते. कदाचित हे तेच हरीण असावे अथवा ते सागरेश्वर येथून आले असावे, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
चौकट
तस्करीची शक्यता
हरणाची तस्करी करण्यासाठी त्यास वाहनातून घेऊन जात असताना तस्करांच्या तावडीतून ते सुटले असावे. त्यानंतर वाहनाने ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा ग्रामस्थांत होती. त्या अनुषंगाने वन विभागाकडून चौकशी करण्याची मागणी आहे.