सोशल मीडियावर उमेदवाराची बदनामी, दोघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
By घनशाम नवाथे | Published: May 12, 2024 05:04 PM2024-05-12T17:04:59+5:302024-05-12T17:05:27+5:30
लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवार विशाल पाटील व कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी करून मतदारांवर प्रभाव पडेल, असे कृत्य केल्याबद्दल दोघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सांगली : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवार विशाल पाटील व कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी करून मतदारांवर प्रभाव पडेल, असे कृत्य केल्याबद्दल दोघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विशाल पाटील यांचे प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी संशयित तानाजी जाधव (रा. सांगली), शुभम शिंदे (रा. घाटनांद्रे) या दोघांविरुद्ध फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोकसभा मतदानाच्या आदल्या दिवशी दि. ६ रोजी सायंकाळी संशयित तानाजी जाधव याने इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, यू-ट्यूब, न्यूज पोर्टलवर लिंक टाकून विशाल पाटील व कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी केली. दादा कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून जाधव याने हेतुपुरस्सर लिंक बनवून ती प्रसारित केली. तसेच विशाल पाटील यांचा व्हिडीओ तयार करून बदनामी केली.
संशयित शुभम शिंदे यानेही खासदार संजयकाका जनसंपर्क नामक व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘मदनभाऊ गट विशाल पाटील यांच्यापासून अलिप्त... विशाल पाटील यांची सीट धोक्यात...’ अशा मजकुराचा व्हिडीओ आणि इतर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केले. दोघा संशयितांनी उमेदवाराची प्रतिमा मलीन करून मतदानावर गंभीर परिणाम होण्यासाठी बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान १७१ (ग), ५०५, ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.