संजीवनी योजनेस बदनामीचा कलंक

By admin | Published: June 4, 2017 11:04 PM2017-06-04T23:04:08+5:302017-06-04T23:04:08+5:30

संजीवनी योजनेस बदनामीचा कलंक

The defamation stigma of Sanjivani Yojana | संजीवनी योजनेस बदनामीचा कलंक

संजीवनी योजनेस बदनामीचा कलंक

Next


गजानन पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यातील रोजगार हमीच्या (मनरेगा) कामात तब्बल ४४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. बोगस कामे, कामातील अनियमितता, शेतकऱ्यांची सहमती नसणे, परगावातील मजूर, यंत्राच्या साहाय्याने काम, बोगस मस्टर, मजुरीचे पैसे बँकेतून ठेकेदारांनी काढणे, कामाच्या जागेतील बदल, निकृष्ट कामे, कामांचे मोजमाप न करता एम.बी. तयार करणे, एकाच कामावर दोन लाभार्थ्यांना लाभ आदी त्रुटीवरून घोटाळा झाला आहे. तालुक्याला संजीवनी ठरू शकणाऱ्या रोजगार हमी योजनेला राजकीय लोकांनी, गावपुढाऱ्यांनी बदनामीचा कलंक लावलेला आहे. घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
रोजगार हमी घोटाळाप्रकरणी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, तीन ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तांत्रिक अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, तालुक्यात झालेल्या १८४७ कामांची चौकशी करावी, जेणेकरून आणखी मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.
अनेक गावांत रोजगार हमीचे ठेकेदार निर्माण झाले आहेत. त्यासाठी साखळीच तयार करण्यात आली आहे. ग्रामसेवक, ग्रामरोजगार, सेवक, तांत्रिक अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तांत्रिक डाटा आॅपरेटर यांना हाताशी धरुन हा सर्व उद्योग सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची कामे झाली, पण या कामातच ग्रामरोजगार सेवकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी सोयीनुसार डल्ला मारला आहे. गावोगावी असलेले ठेकेदार व फुकटचे पैसे पळविणाऱ्या लाभार्थींची चांदी झाली आहे.
तालुक्यातील काशिलिंगवाडी, एकुंडी, बाज या गावांतील कामांची चौकशी झाली आहे. यामध्ये ३६ लाख ७४ हजार रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तर सध्या माडग्याळ येथील कामांची चौकशी सुरू आहे. रोजगार हमीच्या कामाबाबत आसंगी (ता. जत), व्हसपेठ, गिरगाव, कोंतेवबोबलाद, टोणेवाडी, करेवाडी, सिंगनहळ्ळी, पांढरेवाडी, दरीबडची, येळवी, सनमडी, टोणेवाडी, कोसारी, मेंढीगिरी, देवनाळ, प्रतापूर या गावातील कामांबाबत तक्रारी आहेत. कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मनरेगाच्या कामात तालुक्यात तब्बल ४४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या सर्व कामांची इडीमार्फत किंवा त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी केली आहे.
येळवी, टोणेवाडी, खैराव, कुणीकोणूर या भागात शेततलाव, विहिरीच्या कामात गोलमाल, तर प्रतापुरात पेव्हिंग ब्लॉकचे काम, रोपांची लागवड यात घोटाळा झाला आहे. कुणीकोणूरमधील रस्ता कामात व येळवीतील मरिआई मंदिराला सभामंडपाऐवजी व्यायाम शाळा म्हणून व चौकातील सभागृह चुकीच्या पध्दतीने बांधलेले आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.
सध्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी पदभार घेतला आहे. तालुक्यातील मनरेगाच्या सर्व कामांची चौकशी केल्यास महाघोटाळा उघडकीस येईल. यात अनेक भ्रष्ट अधिकारी अडकतील. याची खातेनिहाय किंवा त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The defamation stigma of Sanjivani Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.