बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांचा तोरा
By admin | Published: August 7, 2016 12:12 AM2016-08-07T00:12:37+5:302016-08-07T01:05:47+5:30
तासगाव नगरपरिषद : सभेचे सोपस्कार, गुंडाळलेल्या सभांतून सोयीचा गुलदस्ता
दत्ता पाटील-- तासगाव नगरपालिकेत सर्वसाधारण सभा गुंडाळण्याचा पायंडा तसा नवखा नाही. मात्र विरोधकांसह काही सत्ताधारी नगरसेवकांकडून सभेतील विषयांची चर्चा करुन विषय मंजूर करण्याची मागणीदेखील फेटाळून शुक्रवारची नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली. जनतेच्या हिताचे निर्णय होत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे माध्यम आहे. अशावेळी सभेत कामांचा ऊहापोह करुन निर्णय घेणे अपेक्षित असताना, बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचा तोरा असल्याचे चित्र आहे. काही कारभाऱ्यांच्या सोयीनुसार विषयांना मंजुरी मिळवण्यासाठी अनेक विषय गुलदस्त्यात ठेवूनच सभेचे सोपस्कार पार पडत असल्याचे चित्र आहे.
तासगाव नगरपालिकेत मागील साडेचार वर्षात सत्तेची सूत्रे अनेकांच्या हातातून फिरत राहिली. मात्र महिन्यातून एकदा होणारी सर्वसाधारण सभा गुंडाळण्याचा पायंडा अपवाद वगळता कायम राहिला. अगदी भाजपची सत्ता आल्यानंतरही सभा गुंडाळण्याचा पायंडा कायम राहिला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी काही सभांना सर्व विषयांची चर्चा करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती; मात्र त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच चित्र दिसून येत आहे. वास्तविक नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे कोणताही विषय मंजुर करणे सत्ताधाऱ्यांसाठी अशक्य नाही. मात्र शुक्रवारी विरोधकांनी कधी नव्हे ते सभेतील सर्व विषयांची चर्चा करुन निर्णय घेण्याची मागणी केली. सत्ताधारी गटातील नगरसेवक बाबासाहेब पाटील यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळला.
शहरातील स्वच्छतेचा ठेका बीव्हीजी इंडिया या कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीकडून समाधानकारक स्वच्छता होत नाही. नागरिकांकडून अनेकदा स्वच्छतेबाबत तक्रारी येत असतात. संबंधित कंपनीने स्वच्छतेच्या कामासाठी घेतलेल्या ठेक्याच्या रकमेत प्रत्येकवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. मात्र स्वच्छतेबाबत तक्रारी असतील तर कंपनीला वाढीव रक्कम कशासाठी? असा प्रश्न होता. मात्र शहरातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयाबाबत आणि कंपनीच्या कामाबाबत कोणतीच चर्चा सभागृहात झाली नाही. दुसरीकडे सिध्देश्वर मार्केटमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या निर्णयाबाबत चर्चेची मागणी होत होती.
मोडकळीस आलेल्या या मार्केटच्या जागी नवीन व्यापारी संकुल उभारण्याबाबतचा ठराव यापूर्वीच्या सभेत झाला होता. असे असताना कारण नसताना त्याठिकाणी कशासाठी खर्च होत आहे? असा प्रश्न बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला होता. मात्र याही विषयाबाबत चर्चा झाली नाही. याउलट सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर विरोधकांच्या चर्चेचा आवाज दाबून टाकत, चर्चेशिवाय सभा गुंडाळण्याचा पराक्रम केला.
नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचे एकहाती बहुमत आहे. शुक्रवारच्या सभेत एखादा विषय मंजूर करण्यासाठी नव्हे, तर सभा गुंडाळण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यावेळीदेखील बहुमत सिध्द झाले. असे असतानादेखील चर्चेसाठी सत्ताधाऱ्यांकडून केवळ सोयीचे निर्णय चव्हाट्यावर येऊ नयेत, याचाच धसका घेतला जात असल्याची चर्चा आहे.
निधीचा खर्च : कुचकामी धोरण
नवीन इमारत बांधण्याचा निर्णय झालेला असतानाही, त्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवण्याबाबतचा मुद्दा सत्ताधारी गटातील बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित करून विनाकारण निधी खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपची सत्ता आल्यापासून कोट्यवधी रुपयांचा निधी अशाच पध्दतीने खर्च होत असल्याची तासगावकरांची भावना आहे. मात्र स्वत:च्या सोयीनुसार निर्णय घेणाऱ्या कारभाऱ्यांना कोणतीच खंत नाही. त्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांची मंजूर करून आणलेला निधी सत्ताधाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे जनतेसाठी हितावह ठरत नसल्याचा एक नमुना पाटील यांनी यानिमित्ताने दाखवून दिला आहे.
यापूर्वीही अनेकदा ‘गुंडाळल्या’ सभा
तासगाव नगरपरिषदेत सभा गुंडाळण्याचे प्रकार तसे नवीन नाहीत. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चेची गरज असताना केवळ राजकीय हेतूने बहुमताच्या जोरावर केवळ हात उंचावून ठराव मंजूर करणे निश्चितच शहराच्या विकासाला मारक आहे. पण यामागचे नेमके गौडबंगाल काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.