विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By admin | Published: July 13, 2014 01:02 AM2014-07-13T01:02:32+5:302014-07-13T01:10:01+5:30
अद्याप कोणासही अटक नाही.
जत : तालुक्यातील सालेकिरी येथील तीन शालेय विद्यार्थिनींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून श्री मारुती विंड पार्क डेव्हलपर्स या पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या सुनील सदाशिव चौधरी (रा. तेजलक्ष्मी बंगला, जत) यांच्याविरोधात मुचंडीचे मंडल अधिकारी अरुण एकनाथ कणसे यांनी आज (शनिवारी) जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.
नऊ जुलैरोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान निकिता पाटील (वय १४), पूजा पाटील (११), ऐश्वर्या धोडमणी (८) या तीन अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींचा खड्ड्यातील पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला होता. हा खड्डा श्री मारुती विंड पार्क डेव्हलपर्स या कंपनीने मुरूम खोदण्यासाठी काढला होता. महसूल विभागाने त्यांना पाचशे ब्रास मुरूम खोदण्यासाठी जमिनीत तीन फूट खोलीपर्यंत परवाना दिला असताना त्यांनी १२ फूट खोदून दोन हजार ब्रास मुरूम नेला आहे.
परवान्यापेक्षा जादा १० फूट खोल व एक हजार पाचशे ब्रास जादा मुरुमाची चोरी त्यांनी केली आहे. याची चौकशी स्वत: प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार दीपक वजाळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन केली होती.
मुरूम खोदून नेल्यानंतर या खड्ड्याचे सपाटीकरण त्यांनी करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून दोन सख्ख्या बहिणींसह तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार दीपक वजाळे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तालुक्यातील पवनऊर्जा निर्माण कंपनीचे व्यवस्थापक कर्मचारी, दलाल यांच्यात खळबळ माजली आहे. याची जत पोलिसात नोंद आहे. (वार्ताहर)