बाजार समितीसाठी तिसरी आघाडी निश्चित
By admin | Published: July 12, 2015 11:21 PM2015-07-12T23:21:38+5:302015-07-13T00:33:35+5:30
इच्छुकांच्या मॅरेथॉन मुलाखती : २२ जुलैपूर्वी सर्व पॅनेलची उमेदवार यादी जाहीर होणार
अंजर अथणीकर - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांची तिसरी आघाडी स्थापन करण्याचे निश्चित झाले झाले. शिवसेनेचे पृथ्वीराज पवार यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. या निवडणुकीत तब्बल ५०४ उमेदवार उभे असल्यामुळे नेत्यांनी त्यांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला आहे. आणखी दोन दिवस या मुलाखती चालणार असून दोन्ही पॅनेलकडून २२ जुलैपूर्वीच पॅनेल घोषित करण्यात येणार आहेत. इच्छुकांची गर्दी वाढल्याने तडजोडीसाठी नेत्यांना कसरती कराव्या लागत आहेत.
राष्ट्रवादी, भाजप व मदन पाटील यांची बाजार समितीसाठी आता युती झाली आहे. काँग्रेसनेही जनसुराज्य पक्षाबरोबर निवडणूक लढविण्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. पक्षनिहाय संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र दोन्ही गटांतर्फे इच्छुकांच्या मुलाखती सुरु करण्यात आल्या आहेत. जनता दल, शिवसेना
व स्वाभिमानी शेतकरी संघटना
या निवडणुकीत उतरणार असून
याला अंतिम स्वरूपही देण्यात आले आहे. माजी आ. शरद पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय खा. राजू शेट्टी, माजी आ. संभाजी पवार, शरद पाटील हे घेणार आहेत. येत्या दोन दिवसात ही यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पृथ्वीराज पवार यांनी दिली.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पाच गटात होत असून, त्यानुसार सहकारी संस्था मतदार संघामध्ये २६६८, ग्रामपंचायत मतदार संघामधून २२८६ व हमाल, तोलाईदार मतदार संघातून १५८० मतदार आहेत. त्याचबरोबर व्यापारी मतदार संघामध्ये १३०६ व प्रक्रिया किंवा खरेदी- विक्री संघातून ३७५ मतदार आहेत. एकूण ८ हजार २२५ मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या सोसायट्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र बदलले आहे. यामुळे ज्या क्षेत्रात उमेदवारांचे प्राबल्य आहे, त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी, भाजपकडून सध्या मुलाखती सुरु आहेत. येत्या दोन दिवसात या मुलाखती पूर्ण होणार असून दोन्ही गटातर्फे २२ जुलैपूर्वी पॅनेल जाहीर करण्यात येणार आहे. बंडखोरीचा धोका असला तरी, दोन्ही गटाच्या नेत्यांनी बंडखोरी होणार नसल्याचा दावा केला आहे.
गर्दीने पॅनेलला विलंब
उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे याला विलंब लागत आहे; मात्र आम्ही २२ जुलैपूर्वी पॅनेल जाहीर करू, अशी माहिती भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी दिली.
कोणत्या उमेदवाराची कोणत्या गटात ताकत आहे, याची सध्या पडताळणी सुरू आहे. त्यानुसार उमेदवारी दिली जाणार आहे. या निवडणुकीत बंडखोरी होणार नाही व आम्ही खपवूनही घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बंडखोरीचा धोका!
सर्वच पॅनेलना बंडखोरीची चिंता लागली आहे. बंडखोरांना शांत करणे तितके सोपे नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच पॅनेल जाहीर केले जाणार आहे. जिल्हा बँकेप्रमाणे अद्याप नेत्यांनी उमेदवारांकडून माघारीचे अर्ज भरून घेतले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी बंडखोरीची डोकेदुखी त्यांना सतावण्याची चिन्हे आहेत.
एकमेकांच्या पॅनेलवर लक्ष
तीन पॅनेलची शक्यता सध्या दिसत असली तरी, या तिन्ही गटांनी एकमेकांच्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्या गटात कोणता उमेदवार दिल्यास त्याचे काय फायदे-तोटे होऊ शकतात, याचे गणितही मांडले जात आहे. त्यानुसारच व्यूहरचना केली जाणार आहे.